ठाण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ: MIM ला मोठा धक्का; ‘कैसा हराया’ फेम सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांचा शिंदे गटात प्रवेश
दैनिक शब्दमत
ठाण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ: MIM ला मोठा धक्का; ‘कैसा हराया’ फेम सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांचा शिंदे गटात प्रवेश
विशेष प्रतिनिधी | ठाणे: दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
ठाणे आणि मुंब्रा येथील राजकारणात एक मोठी आणि खळबळजनक राजकीय घडामोडी समोर आली आहे. एमआयएम (MIM) पक्षाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि ‘कैसा हराया’ फेम नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांनी एमआयएम पक्षाला जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
केबल सेनेच्या कळवा-मुंब्रा विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती
शिवसेनेत प्रवेश करताच युनूस शेख यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेनेच्या ‘अखिल भारतीय केबल सेना’ या शाखेच्या कळवा-मुंब्रा विधानसभा अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसारच हे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
‘मुंब्रा हिरवा करू’ म्हणणाऱ्या नगरसेविकेचे वडील आता हिंदुत्वाच्या वाटेवर
काही महिन्यांपूर्वी ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर सहर शेख यांचे “कैसा हराया” हे भाषण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. या भाषणात त्यांनी विरोधकांना डिचवत ‘संपूर्ण मुंब्रा हिरवा करू’ असा दावाही केला होता. मात्र, आता मुंब्रा हिरवा करण्याची भाषा करणाऱ्या सहर शेख यांचेच वडील युनूस शेख यांनी थेट हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
जितेंद्र आव्हाडांचे समर्थक ते MIM आणि आता शिवसेना
युनूस शेख हे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय मानले जात होते. मात्र, महापालिका निवडणुकीच्या काळात या मैत्रीत दुरावा आला. त्यांनी आपल्या मुलीसाठी (सहर शेख) शरद पवार गटाकडे उमेदवारी मागितली होती. परंतु ऐनवेळी तिकीट न मिळाल्याने त्यांनी मुलीसह एमआयएम (MIM) पक्षात प्रवेश केला आणि विजय मिळवला. विजयी सभेत या बाप-लेकीने ‘जीजी’ म्हणत जितेंद्र आव्हाडांवर जोरदार टीका केली होती.
आता युनूस शेख यांनी थेट शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाणे व मुंब्रा भागातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तव
ली जात आहे.






