
दुष्काळसदृश परिस्थितीमुळे १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; AIMIM ची विभागीय आयुक्तांकडे मागणी
वसूल केलेले परीक्षा शुल्क तत्काळ विद्यार्थ्यांना परत (Refund) करण्याचीही निवेदनाद्वारे मागणी
छत्रपती संभाजीनगर (विशेष प्रतिनिधी): दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इयत्ता १० वी (नियमित व १७ नंबर फॉर्म) आणि १२ वीच्या (सर्व शाखा) विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ करण्यात यावे, तसेच आधी वसूल केलेले शुल्क तत्काळ परत (Refund) करण्यात यावे, अशी जोरदार मागणी ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ (AIMIM) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात AIMIM चे तालुका अध्यक्ष सिरोज सौदागर व पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात पावसाअभावी शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हाताला रोजगार उपलब्ध नसल्याने शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडून पडले आहे. अशा बिकट परिस्थितीत पाल्यांचे शिक्षण चालू ठेवणे आणि बोर्डाचे परीक्षा शुल्क भरणे पालकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.
शासनाच्या दुष्काळ निवारण धोरणानुसार टंचाईसदृश भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व परीक्षा शुल्कातून सूट देण्याची कायदेशीर तरतूद आहे. तरीही अनेक शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून नियमित शुल्काची सक्ती केली जात आहे किंवा खाजगी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
AIMIM च्या मुख्य मागण्या:
१. १० वी (SSC) नियमित विद्यार्थी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १० वीच्या सर्व नियमित विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षाचे संपूर्ण परीक्षा शुल्क तत्काळ पूर्णपणे माफ करावे.
२. १० वी ‘फॉर्म नं. १७’ (खाजगी/External) विद्यार्थी: आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू, अनाथ किंवा शाळाबाह्य विद्यार्थ्यांची नोंदणी व परीक्षा फी सरसकट १००% माफ करण्यात यावी.
३. १२ वी (HSC) सर्व शाखा: उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक (MCVC) अभ्यासक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करावे.
४. वसूल केलेले शुल्क त्वरित परत (Refund) करा: ज्या शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून आधीच परीक्षा शुल्क जमा करून घेतले आहे, ते शुल्क तत्काळ संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग (Refund) करण्याचे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाला देण्यात यावेत.
दुष्काळाच्या या अत्यंत हलाखीच्या काळात केवळ पैशांअभावी कोणताही होतकरू अथवा गरजू विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेपासून वंचित राहू नये, अशी ठाम भूमिका AIMIM ने घेतली आहे. या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित शिक्षण उपसंचालक व विभागीय सचिव (SSC/HSC Board) यांना तातडीने अधिकृत आदेश निर्गमित करावेत, अशी मागणी तालुका अध्यक्ष सिरोज सौदागर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव आणि बोर्ड अध्यक्षांनाही पाठवण्यात
आल्या आहेत.





