रोपळेकर चौक बॅग स्नेचिंग प्रकरण: जवाहरनगर पोलिसांची धडक कारवाई; आरोपी १२ तासांत गजाआड, ४० हजारांचा मुद्देमाल जप्त
राजेंद्र ओढेकर
छत्रपती संभाजीनगर (दैनिक शब्दमत):
रोपळेकर चौकात एका पानटपरी चालकाची सामानाची बॅग बळजबरीने हिसकावून पसार झालेल्या आरोपीला जवाहरनगर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत जेरबंद केले आहे. आरोपीकडून चोरी केलेला पूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली.
नक्की काय घडले?
१० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास टिळकनगर उल्कानगरी येथील रहिवासी व पानटपरी चालक जितेंद्र रणछोडदास वैष्णव (वय ५८) हे नेहमीप्रमाणे रोपळेकर चौक जवळील ‘सागर पान टपरी’ साफ करून उघडत होते. त्यावेळी त्यांच्या हातात सामानाची काळ्या रंगाची बॅग होती. इतक्यात काल्डा कॉर्नर बाजूकडून लाल-काळ्या रंगाच्या विनानंबर मोटारसायकलवरून हेल्मेट परिधान केलेला एक इसम आला. त्याने वैष्णव यांच्या हातातील बॅग बळजबरीने हिसकावून पळ काढला.
बॅगमध्ये ३२,५६० रुपये किमतीचे सिगारेट, बिडी व माचिसचे पाकिटे, ७,८०० रुपये रोख आणि ६०० रुपयांचे Paytm व BharatPe चे स्पीकर व स्कॅनर असा एकूण ४०,९६० रुपयांचा मुद्देमाल होता. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०४ (२) अन्वये गुन्हा नोंदवून तपास पोह/१४३२ तडवी यांच्याकडे सोपवण्यात आला.
अशी झाली कारवाई
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अंमलदार मारोती गोरे आणि राजेंद्र शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्तबातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे फिरवली. आरोपी सातार परिसरातील नाईक नगर येथे असल्याची टीप मिळताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व सायबर सेलच्या तांत्रिक मदतीने मनीष दिलीप गोरवाडकर (वय ४३, रा. देवगिरी कॉलनी, सातारा बीड बायपास, धंदा: सिक्युरिटी गार्ड) याला ताब्यात घेण्यात आले.
सखोल चौकशीदरम्यान आरोपीने हेल्मेट घालून टीव्हीएस मोटारसायकलवरून चोरी केल्याची कबुली दिली.
मुद्देमाल जप्त व पोलीस कोठडी
आरोपीला ११ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडी दरम्यान पोलिसांनी चोरीस गेलेला संपूर्ण ४०,९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तपास पथक
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त श्री. प्रवीण पवार, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ-०२) श्री. रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त (उस्मानपुरा विभाग) श्री. मनिष कल्याणकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोह/१४३२ तडवी, पोअं/२४८२ मारोती गोरे व पोअं/२६०० राजेंद्र शिंदे यांच्या
पथकाने केली.





