पैठणमध्ये भरदिवसा शेतकऱ्याची १ लाख ५८ हजारांची रोकड लंपास!
बँकेतून काढलेली रक्कम आणि पीक कर्जाची फाईल पळवली; बसस्थानक परिसरातील घटनेने खळबळ
पैठण | दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क
पैठणमध्ये भरदिवसा शेतकऱ्याची १ लाख ५८ हजारांची रोकड लंपास!
बँकेतून काढलेली रक्कम आणि पीक कर्जाची फाईल पळवली; बसस्थानक परिसरातील घटनेने खळबळ
पैठण | दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क
पैठण शहरातील गजबजलेल्या बसस्थानक परिसरात शुक्रवारी (दि. २) दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एका शेतकऱ्याची पैशांची पिशवी हिसकावून नेल्याची घटना घडली. बँकेत सोन्याचे दागिने गहाण ठेवून घेतलेली १ लाख ५८ हजार रुपयांची रोकड आणि पीक कर्जाची महत्त्वाची फाईल चोरट्यांनी लंपास केली. भरदिवसा मुख्य रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे पैठण शहरात खळबळ उडाली आहे.
या घटनेतील शेतकऱ्याचे नाव मनोज नालकर (रा. वडवळी, ता. पैठण) असे आहे.
पैसे पडल्याचे सांगून लक्ष विचलित केले
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज नालकर यांनी पैठण येथील बँक ऑफ बडोदा शाखेत सोन्याचे दागिने गहाण ठेवून १ लाख ५८ हजार रुपये घेतले होते. बँकेतून पैसे काढल्यानंतर त्यांनी रस्ता ओलांडून उभी केलेल्या दुचाकीच्या पिशवीत ही रक्कम ठेवली.
याचवेळी एका अज्ञात तरुणाने त्यांना पैसे पडल्याचे सांगितले. खाली पडलेली शंभर रुपयांची नोट उचलून खिशात ठेवल्यानंतर नालकर यांनी पुढील कामासाठी जाण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी संधी साधल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पिशवी हिसकावली
मनोज नालकर हे पैशांची पिशवी आणि पीक कर्जाची फाईल घेऊन बसस्थानकाजवळील हॉटेल सूर्या परिसरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत फाईल जमा करण्यासाठी जात होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींपैकी एकाने त्यांच्या हातातील पिशवी हिसकावून घेतली. त्यानंतर दोघेही दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नालकर यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने पैठण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. संबंधित चोरटे पिशवी हिसकावताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचेही समोर आले आहे.
आर्थिक संकटात शेतकऱ्याला मोठा फटका
दुष्काळी परिस्थिती आणि शेतीतील आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला या घटनेमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. सोन्याचे दागिने गहाण ठेवून मिळवलेली रक्कम चोरीला गेल्याने नालकर यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यातच पीक कर्जाची फाईलही चोरीला गेल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांबाबत चिंता
पैठण शहरात चोरी आणि नागरिकांकडील पैसे लंपास करण्याच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी घडलेल्या अशाच प्रकारच्या काही घटनांचा तपास अद्याप लागलेला नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. शहरातील संवेदनशील भागांत पोलिसांनी गस्त वाढवावी, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घ्यावा आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
गजबजलेल्या परिसरात भरदिवसा शेतकऱ्याची एवढी मोठी रक्कम लंपास झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता पैठण पोलीस या प्रकरणाचा तपास करून चोरट्यांना कधी पकडतात आणि शेतकऱ्याची रक्कम परत मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






