प्रतिबंधित ‘नाथसागर’ परिसरात ड्रोन उडवणे पडले महागात; दहशतवाद विरोधी शाखेकडून गुन्हा दाखल….
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क पैठण
जायकवाडी धरणाचा (नाथसागर) परिसर हा सुरक्षेच्या कारणास्तव ‘नो ड्रोन झोन’ (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आलेला असतानाही, नियमांचे उल्लंघन करून ड्रोनद्वारे चित्रीकरण करणाऱ्या एका तरुणावर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने (ATB) कारवाई केली आहे.
दहशतवाद विरोधी शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की, एका इसमाने पैठण येथील नाथसागर जलाशय परिसरात बेकायदेशीरपणे ड्रोन उडवून त्याचे चित्रीकरण केले असून, त्यापासून बनवलेली ‘रील्स’ सोशल मीडियावर प्रसारित केली आहे. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे आणि त्यांच्या पथकाने इन्स्टाग्रामवरील त्याच्या खात्याची तपासणी केली.
तपासात असे निष्पन्न झाले की, मनोज राजेंद्र देहाडे (वय २६, रा. पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) याने १५ मार्च २०२६ रोजी आपल्या ‘धुरंधर बाईक रायडर’ ग्रुपसोबत नाथसागर येथे जाऊन अनधिकृतपणे ड्रोनद्वारे शूटिंग केले होते.
यावेळी त्याने नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि अपर पोलीस महासंचालक (महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, नाथसागर जलाशय आणि त्याभोवतीचा ५ किलोमीटरचा परिसर हा ‘रेड झोन’ अर्थात प्रतिबंधित क्षेत्र आहे. या ठिकाणी दर्शनी भागात ‘नो ड्रोन झोन’चे फलक लावलेले असतानाही, कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता हे चित्रीकरण करण्यात आले होते.
संबंधित इसमाने जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पोलीस विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, त्याच्याविरुद्ध कायदेशीर पावले उचलण्यात आली आहेत. याप्रकरणी मनोज राजेंद्र देहाडे याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, ड्रोन अधिनियम २०२१ चा नियम २२, आणि वायुमान अधिनियम १९३४ चे कलम १० अन्वये गुन्हा पोलीस ठाणे पैठण येथे दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री विनय कुमार राठोड साहेब, छत्रपती संभाजी नगर ग्रामीण, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथील API गोरे, PSI खंडागळे, Asi विक्रम देशमुख, Hc अविनाश बोर्डे, संजय घुगे, श्रीमंत भालेराव, राजेंद्र डकले, गणेश घोरपडे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे पैठण हे करीत आहेत.
पोलिसांचे आवाहन:
महत्त्वाची धरणे, शासकीय इमारती आणि संवेदनशील ठिकाणे ही ‘नो ड्रोन झोन’ अंतर्गत येतात. अशा ठिकाणी विनापरवाना ड्रोन उडवणे हा गंभीर गुन्हा असून, नागरिकांनी आणि हौशी फोटोग्राफर्सनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.






