नागपूर पदवीधर मतदारसंघ: एकाच नंबरवरून तब्बल २२ हजार मतदारांची नोंदणी; काँग्रेसचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
शब्दमत विशेष वृत्त | नागपूर: दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
राज्यातील विधानपरिषदेच्या जागांसाठी प्रचार संपल्यानंतरही राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात एकाच मोबाईल क्रमांकाचा वापर करून तब्बल २२ हजार मतदारांची नोंदणी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी निवडणूक आयोग भाजप धार्जिणे काम करत असल्याचा थेट आरोप काँग्रेसचे राज्याचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषदेत केला.
‘५४३२१५४३२१’ या क्रमांकावरून नोंदणी
अतुल लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘५४३२१५४३२१’ या एकाच विशिष्ट क्रमांकावरून सुमारे २२ हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. हा प्रकार निवडणूक आयोगाच्या कसा लक्षात आला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच मतदार यादीत मोठ्या प्रमाणात बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्डचा वापर करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
यापूर्वीही पदवीधर निवडणुकीत ८ हजार ७४४ दुबार मते आल्याचे पुराव्यासह मुख्य निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयुक्त आणि नागपूर निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते; मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे निवडणूक आयोग भाजपला हाताशी धरून गोंधळ घालत आहे का? असा घणाघाती आरोप लोंढे यांनी केला.
काँग्रेस ठेवणार वॉच; बोगस मतदारांना सोडणार नाही
निवडणूक अधिकारी विजयालक्ष्मी बिदरी यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली असून तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे. “मतदार यादीतील बनावट आधार व पॅन कार्डचा वापर आयोगाने समोर आणावा. मतदानाच्या दिवशी काँग्रेसतर्फे प्रत्येक बूथवर विशेष वॉच ठेवला जाईल आणि बोगस मतदान करणाऱ्यांना काँग्रेस अजिबात सोडणार नाही,” असा इशाराही अतुल लोंढे यांनी दिला.
केंद्र व राज्य सरकारवर टीका करताना देशात महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी आणि उद्योजकांचे प्रश्न गंभीर बनले असून भाजप सरकार या प्रश्नांवर सपशेल अपयशी ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले







