ग्राहकांना गॅस वितरण घरपोच करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर, दि.३० – घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि स्थिती पूर्ववत करण्यासाठी कठोर उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले. गॅस सिलिंडर ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत घरपोच देणे आवश्यक आहे. गॅस पुरवठ्याबाबत येत असलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी स्वामी यांनी गॅस पुरवठादार संस्थांची बैठक बोलावली होती. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, गॅस उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी नितीन बजाज, शुभम चौहान, रेखा केदारे, माधुरी कदम, सविता काकडे आणि इतर गॅस वितरक उपस्थित होते. जिल्ह्यात गॅसचे बुकिंग वाढले असून, युद्धाच्या पार्श्वभूमीवर हे बुकिंग वाढले आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यातील सरासरी पुरवठ्याइतकीच मागणी असल्याचे कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले. गॅसचे बुकिंग ऑनलाइन होत आहे, मात्र सिलिंडर घेण्यासाठी अनेक लोक थेट एजन्सीवर येतात, असे एजन्सीधारकांनी सांगितले. जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, ग्राहकाने बुकिंग केल्यानंतर सिलिंडर घरपोच देणे आवश्यक आहे. सध्या नवीन गॅस जोडणीचे काम बंद आहे आणि काही ग्राहकांचे ई-केवायसी अपूर्ण आहे, असेही त्यांनी सांगितले. यासाठी प्रशासनाचा एक कर्मचारी गॅस एजन्सीवर नियुक्त केला असून, २४ तासांच्या आत वितरण सुरळीत न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिला. गॅस एजन्सीधारकांनी काही ठिकाणी डिलिव्हरी वाहनांसाठी पोलीस बंदोबस्त आवश्यक असल्याचे सांगितल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना तसे करण्याच्या सूचना दिल्या.
#BreakingNews #harsulnews #chhatrapatisambhajinagar #LPGGasCrisis shabdmat.com








