बारापुल्ला गेट येथे मनपाच्या कचरा गाडीची धडक; २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : शहरातील बारापुल्ला गेट परिसरात आज दुपारी घडलेल्या भीषण अपघातात एका २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. महानगरपालिकेच्या भरधाव कचरा गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत ओमकार खनसे (वय २०, रा. बजाज नगर) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ओमकार खनसे हा एसबी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. आज दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे बारापुल्ला गेट परिसरातून जात असताना अचानक मनपाच्या कचरा गाडीने त्याला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, ओमकारला स्वतःचा बचाव करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. ऐन तारुण्यात झालेल्या या दुर्दैवी मृत्यूमुळे खनसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून बजाज नगर परिसरात शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच छावणी पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवला.
दरम्यान, पोलिसांनी संबंधित कचरा गाडीच्या चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, शहरात कचरा गाड्यांच्या वाढत्या वेगावर आणि निष्काळजीपणावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.








