खोटे नगरसेवक बनून रुग्णालयात दमदाटी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर, दि. १० एप्रिल :
महानगरपालिकेच्या एन-८ व मेल्ट्रॉन रुग्णालयात स्वतःला नगरसेवक म्हणून भासवून डॉक्टर व कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या दोन इसमांविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
इमरान सालार (रा. बुडीलेन) व असरार अहमद (रा. रहमानिया कॉलनी) अशी संबंधितांची नावे आहेत. आज सकाळी सुमारे ११ ते दुपारी २.१५ दरम्यान एन-८ रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागाच्या वेळेत हे दोघे उपस्थित राहून स्वतःला नगरसेवक असल्याचे सांगत डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडे विविध कागदपत्रांची मागणी करत होते. तसेच कामकाजाबाबत चौकशी करत दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या वर्तनाची नोंद घेण्यासाठी फोटो व व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता, संबंधितांनी त्यास विरोध करत चित्रीकरणास मज्जाव केला.
यानंतर दुपारी ३ ते सायंकाळी सुमारे ६.४५ दरम्यान मेल्ट्रॉन रुग्णालयातही त्यांनी हाच प्रकार सुरू ठेवत डॉक्टर व स्टाफकडे स्टॉक रजिस्टर दाखविण्याची मागणी केली. रजिस्टर ताब्यात घेऊन त्यातील नोंदींच्या झेरॉक्स प्रती बाहेरून काढल्याचेही समोर आले आहे.
सहकार्य न केल्यास डॉक्टरांना निलंबित करण्याची धमकी देत अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. विशेष म्हणजे, याच वेळी रुग्णालयात लेप्रोस्कोपी शस्त्रक्रियेसाठी १५ महिला रुग्ण दाखल होत्या, त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
या गंभीर प्रकाराची दखल घेत संबंधित दोघांविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.








