📰 दैनिक शब्दमत | विशेष वृत्त
वैद्यकीय समितीचा अहवाल गंभीर; डॉ. प्रेरणा देवधर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर, दि. १८ (प्रतिनिधी)
बाळंतपणादरम्यान महिला रुग्णाचा मृत्यू टाळता येण्यासारखा होता, असा गंभीर ठपका वैद्यकीय चौकशी समितीने ठेवत कमलनयन बजाज हॉस्पिटलच्या डॉ. प्रेरणा आनंद देवधर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्यायसंहितेच्या कलम १०६ (१) अंतर्गत सातारा पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली.
गारखेडा परिसरातील साईनगर येथील रहिवासी कार्तिक संतोष वाघचौरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या पत्नी ऋतुजा वाघचौरे यांचे गरोदरपणापासून उपचार डॉ. देवधर यांच्याकडे सुरू होते. १४ डिसेंबर २०२५ रोजी बाळंतपणासाठी त्यांना कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सीझेरियन शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी मुलगा झाल्याची माहिती देण्यात आली.
मात्र त्यानंतर ऋतुजा यांची प्रकृती अचानक खालावू लागली. अंगावर चट्टे येणे आणि लघवीचा त्रास वाढणे अशी लक्षणे दिसू लागली. प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. परंतु त्रास वाढल्याने २३ डिसेंबर रोजी पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती अधिकच बिघडल्याने आयसीयूमध्ये हलविण्यात आले, मात्र दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेनंतर नातेवाईकांनी उपचार प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार घाटी रुग्णालय तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त चौकशी समिती स्थापन करण्यात आली. समितीने दिलेल्या अहवालात मृत्यू टाळता येण्याची शक्यता होती, असे नमूद करण्यात आले आहे.
या निष्कर्षांच्या आधारे डॉ. प्रेरणा देवधर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे करत आहेत.
—
👉 प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
या घटनेमुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चौकशीचा अहवाल आणि पुढील तपासातून अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.









