दिलीप जैन. (पाचोरा)
दिनांक~०५/०५/२०२६
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
सोशल मीडियावर अफवा पसरवून पोलिस प्रशासनावर खोटे आरोप करणाऱ्या बोगस तोतया पत्रकाराविरुद्ध भडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करत कडक कारवाई केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी सोशल मीडिया वापराबाबत स्पष्ट इशारा दिला आहे.
दिनांक ३ मे २०२६ रविवार रोजी आरोपी विठ्ठल मराठे याने विविध व्हॉट्स अॅप ग्रुप्सवर तीन व्हिडिओ प्रसारित केले. या व्हिडिओमध्ये गिरणा नदी पात्रातील वाळू वाहतुकीबाबत पोलिसांकडून हस्ते वसुली होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. मात्र प्राथमिक चौकशीत हे सर्व आरोप पूर्णपणे तथ्यहीन व दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रविण कडू परदेशी यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) २०२३ च्या कलम ३५६ (२) अंतर्गत (एन.सी.आर.) क्रमांक ०४१०/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, पोलिसांची बदनामी करणे आणि सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत.
भडगाव पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, पुराव्याशिवाय सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ किंवा मेसेज प्रसारित करून अफवा पसरवणाऱ्यांवर यापुढे कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करावा, अफवा पसरवू नयेत आणि कायद्याचा आदर राखावा, असे आवाहनही पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अशाच प्रकारचा गुन्हा पाचोरा तालुक्यात दाखल होऊ शकतो अशी जोरदार चर्चा पाचोरा व पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरु असून या विषयाकडे सर्वसामान्य सुज्ञ नागरिकांचे लक्ष लागले असून सोशल मीडियावर अशा अफवा पसरवून सर्वसामान्य नागरिकांना व अधिकाऱ्यांना विनाकारण त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात आला पाहिजे अशी जोरदार मागणी केली जात आहे.
*भडगाव पोलीस, आपली सुरक्षा, आमची जबाबदारी*






