दुय्यम निबंधकासह सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
शासकीय कागदपत्रात फेरफार करून ५ लाख ७० हजारांचा गंडा; महसूल विभागात खळबळ
दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद प्रतिनिधी
जळगाव : जळगाव जामोद शहरातील जमिनीच्या व्यवहारात शासकीय कागदपत्रात फेरफार करून ‘ब वर्ग’ जमिनीचे ‘अ वर्ग’ धारणाधिकारात रूपांतर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव जामोद येथील सह दुय्यम निबंधक सुनील पंढरी चव्हाण यांच्यासह एकूण सहा जणांविरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाप्रमुख मुस्ताक भाईजान यांचाही समावेश असल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी मनीषकुमार भिकमचंद गांधी यांनी २४ फेब्रुवारी रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, जळगाव जामोद नगर परिषद हद्दीतील शिट क्रमांक १५-सी, प्लॉट क्रमांक ५६, क्षेत्रफळ २४०.३० चौ.मी. जागा विक्रीसाठी आरोपींनी दाखविली होती. सदर जागा ‘ब वर्ग’ प्रकारातील असल्याने तिच्या खरेदीसाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक होती. यासाठी फिर्यादीने आरोपी अ. हबीब मो. मुसा व मो. शरीफ मो. मुसा यांच्या नावे ५ लाख ७० हजार रुपये धनादेशाद्वारे अदा करून सौदाचिट्ठी केली होती.
मात्र, शासन परवानगीचे प्रकरण उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रलंबित असतानाच आरोपींनी संगनमत करून जमिनीच्या अभिलेख पत्रिकेमध्ये संगणकाद्वारे फेरफार केल्याचा आरोप आहे. ‘ब वर्ग’ ऐवजी ‘अ वर्ग’ असा बदल करून सदर मालमत्तेचे खरेदीखत आरोपी मो. मुस्ताक मो. मुसा उर्फ भाईजान यांच्या नावे नोंदवण्यात आले. या प्रक्रियेत सह दुय्यम निबंधक सुनील चव्हाण यांनी कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष केल्याचा तसेच पदाचा गैरवापर केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे महसूल व निबंधक विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शासकीय अभिलेखांमध्ये फेरफार करून व्यवहार कसे झाले, याबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बुलडाणा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार आरोपी अ. हबीब मो. मुसा, मो. शरीफ मो. मुसा, मो. मुस्ताक मो. मुसा उर्फ भाईजान, सह दुय्यम निबंधक सुनील पंढरी चव्हाण यांच्यासह एकूण सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ४२०, ४६८, ४७१ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीनकुमार पाटील करीत आहेत.







