खळबळजनक बातमी | जाफ्राबाद हादरले* शहरवासीयांना भितीदायक वातावरण…
मिरची चे व्यापारी शेख मोहसीन यांची चोरट्यांकडून निर्घृण हत्या; जाफ्राबाद पोलिसांपुढे तगडे आव्हान
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
जाफराबाद प्रतिनिधि : मोहम्मद बाईयाश
दिनांक 27 मे 2026 च्या मध्यरात्री जाफ्राबाद शहरातील जंजाळवाडी परिसर, चिखली रोडवर घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. बुलेट चोरी करणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करणे मिरची व्यापारी *शेख मोहसीन शेख मजीद (वय 46) यांच्या जीवावर बेतले.
काय घडले नेमके?
मध्यरात्री शेख मोहसीन यांची बुलेट त्यांच्या घरासमोर उभी केलेली होती शेख मोहसीन यांनी काहीतरी वाजल्याचे कळताच घरा समोर ची बुलेट चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी त्यांच्या पुतण्या शेख साहिल याला सोबत घेऊन चोरट्यांचा पाठलाग केला.
जाफ्राबाद ते चिखली रोडवरील मौजे जंजाळवाडी परिसरात चोरट्यांनी त्यांना गाठून धारदार शस्त्राने सपासप वार केले.
7 ठिकाणी वार, उपचारादरम्यान मृत्यू
डोके, मान, पाठ आणि दंडावर तब्बल 7 जीवघेणे वार झाल्याने शेख मोहसीन गंभीर जखमी झाले.होते, त्यांना तातडीने जालना येथे हलवत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. पुतण्या शेख साहिलही हल्ल्यात गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
आरोपी फरार, पोलिसांची नाकाबंदी
हल्ल्यानंतर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच जाफ्राबाद चे पोलीस निरीक्षक सतीश जाधव व पोलिसांनी रात्रीतच शहराच्या चोहोबाजूंनी नाकाबंदी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक चोरट्यांच्या मागावर रवाना झाले आहे.
शहरात भीतीचे वातावरण, हळहळ व्यक्त
मयत शेख मोहसीन हे न्यू हायस्कूलचे शिक्षक शेख मोबिन सर यांचे लहान बंधू होते. मनमिळाऊ स्वभावाच्या मोहसीन यांच्या निर्घृण हत्येने व्यापारी वर्गासह संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.
*पोलिसांपुढे आव्हान
दिवसेंदिवस वाढणाऱ्या चोऱ्या, रात्रीच्या वेळी गस्तीचा अभाव आणि आता भररस्त्यात व्यापाऱ्याची हत्या – यामुळे जाफ्राबाद पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपींना जेरबंद करणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान ठरले आहे.
जाफ्राबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश जाधव करत आहेत. सदरील माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भारती यांनी सुध्दा हादीत नाकाबंदी करून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता
–







