कोनेवाडी-दरेगाव येथे सामाजिक समता संघाची शाखा स्थापन
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर येथील कोनेवाडी-दरेगाव येथे सामाजिक समता संघाची नवीन शाखा स्थापन करण्यात आली. यानिमित्त रविवार (दि. 28 जून 2026) रोजी दुपारी 12 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीरंग ससाणे हे होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि एकलव्य यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. तसेच भिल वस्तीचे “एकलव्य नगर” असे नामकरण करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना श्रीरंग ससाणे यांनी सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती समाजाला आरक्षणाचा अधिकार दिला. संविधानाचे लाभार्थी असूनही अनुसूचित जमाती समाज बाबासाहेबांच्या विचारांपासून दूर आहे. त्यामुळे फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा स्वीकार करून समाजाने प्रगतीचा मार्ग स्वीकारावा.”
यावेळी राज्य उपाध्यक्ष राजपाल सौदे, मराठवाडा संघटक मच्छिंद्र गायकवाड, माजी सरपंच हिरामण पवार तसेच पोलीस पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
बैठकीत एकलव्य नगर शाखेची पदाधिकारी निवड करण्यात आली. त्यामध्ये शाखाध्यक्षपदी हिरामण पवार (माजी सरपंच), सचिवपदी संदीप पवार, उपाध्यक्षपदी रावसाहेब पवार, संघटकपदी गोरख पवार यांची निवड करण्यात आली. तसेच सदस्य म्हणून सुखदेव पवार, गीताराम माळी, बाळू बर्डे आणि संजय हटकर यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कमल पवार, मिरा पवार, जनाबाई पवार आणि चंद्रकला पवार यांच्यासह महिला मंडळाने विशेष परिश्रम घेतले.








