विकसित भारत @2047 च्या दिशेने छत्रपती संभाजीनगरची भक्कम वाटचाल
‘सिटी ट्रान्सफॉर्मेशन युनिट’मुळे शहर विकासाला नवी दिशा; ‘मित्र’ संस्थेसोबत लवकरच सामंजस्य करार
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क 
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी : विकसित भारत @2047 आणि विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेला अनुसरून छत्रपती संभाजीनगरचा शाश्वत, आधुनिक आणि नागरिक-केंद्रित विकास साधण्यासाठी महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्याअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या सिटी ट्रान्सफॉर्मेशन युनिट (CTU) मार्फत शहराच्या दीर्घकालीन विकास आराखड्याचे सादरीकरण महापौर समीर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
बैठकीस स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद, आयुक्त अमोल येडगे, शहर अभियंता संजय कोंबडे, उपायुक्त नंदकिशोर भोंबे, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA) चे वरिष्ठ सल्लागार निखिल नानगुडे, क्षेत्र तज्ज्ञ आनंद जोशी तसेच महानगरपालिकेचे विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
शहर विकासाचा व्यापक आराखडा सादर
सिटी ट्रान्सफॉर्मेशन युनिटने औद्योगिक विकास, पर्यटन व वारसा संवर्धन, शिक्षण, तंत्रज्ञानाधिष्ठित शहर विकास, ऊर्जा वितरण, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक परिवहन, आर्थिक क्षमता वाढ, रस्त्यांचे आधुनिकीकरण तसेच पादचारी सुरक्षेसह विविध विषयांवरील विकास आराखडा सादर केला.
‘मित्र’ संस्थेच्या सहकार्याने विकासाला गती
महानगरपालिकेने चालू अर्थसंकल्पात सिटी ट्रान्सफॉर्मेशन युनिटसाठी निधीची तरतूद केली असून, महाराष्ट्र शासनाच्या ‘मित्र’ (MITRA) संस्थेसोबत लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या करारामुळे शहर विकास आराखडा, प्रकल्प व्यवस्थापन, तांत्रिक मार्गदर्शन, डेटा-आधारित मॉनिटरिंग प्रणाली आणि तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.
मान्यवरांचे मत
महापौर समीर राजूरकर यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये जागतिक वारसा, औद्योगिक क्षमता, शैक्षणिक संस्था आणि पर्यटनाची मोठी ताकद असून सिटी ट्रान्सफॉर्मेशन युनिटच्या माध्यमातून 2047 पर्यंत आधुनिक आणि विकसित शहर घडविण्याचे उद्दिष्ट साध्य होईल.
स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी विकासकामांना निश्चित दिशा, पारदर्शकता आणि गती देण्यासाठी हे युनिट महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले.
आयुक्त अमोल येडगे यांनी डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शहर नियोजनासाठी सिटी ट्रान्सफॉर्मेशन युनिट हे भविष्यातील ‘थिंक टँक’ म्हणून कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला.
शहराच्या विकासक्षमतेवर भर
अजिंठा-वेरूळ लेण्या, दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा, विकसित होत असलेले औद्योगिक क्षेत्र, उत्कृष्ट शैक्षणिक संस्था आणि वाढती गुंतवणूक क्षमता यामुळे छत्रपती संभाजीनगर हे महाराष्ट्रातील सर्वाधिक विकासक्षम शहरांपैकी एक असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले. उद्योग, पर्यटन, शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात शहराला राष्ट्रीय स्तरावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार महानगरपालिकेने व्यक्त केला.







