सोयगावच्या पर्यटन विकासाला चालना; रुद्रेश्वर लेणी, वाडी किल्ला, गंगाधार धबधबा व जंजाळा किल्ल्याची पर्यटन विभागाकडून पाहणी
दैनिक शब्दमत न्युज
सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग.
सोयगाव तालुक्यातील ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळांच्या विकासाला गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्हा परिषद सदस्य श्रीमती पुष्पाताई प्रकाश काळे यांच्या विशेष पुढाकारातून सादर करण्यात आलेल्या ‘सोयगाव पर्यटन विकास प्रस्ताव’ अनुषंगाने आज पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रुद्रेश्वर लेणी, वाडी किल्ला, गंगाधार धबधबा आणि जंजाळा किल्ला या महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची प्रत्यक्ष पाहणी केली.
यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटन संचालनालयाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत, श्रीमती पुष्पाताई प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. तेजस्विनी काळे यांनी सोयगाव परिसरातील १४ प्रमुख पर्यटन स्थळांच्या सर्वांगीण विकासाचा प्रस्ताव अधिकृतपणे सादर केला होता. या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत पर्यटन विभागाने प्रत्यक्ष पाहणीला सुरुवात केली आहे.
प्रादेशिक उपसंचालक विजय जाधव यांच्या मार्गदर्शना खाली आजच्या पाहणी दौऱ्यात जिल्हा पर्यटन अधिकारी अजुमुद्दीन शेख तसेच जिल्हा पर्यटन कृषी अधिकारी शिवाजी गायकवाड यांनी पर्यटन विभागाच्या पथकासह रुद्रेश्वर लेणी, वाडी किल्ला, गंगाधार धबधबा आणि जंजाळा किल्ला या स्थळांची पाहणी करून पर्यटन विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, रस्ते, दिशादर्शक फलक, पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा आणि संवर्धनाच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा आढावा घेतला.
सोयगाव तालुक्यातील रुद्रेश्वर लेणी, वाडी किल्ला, गंगाधार धबधबा, जंजाळा किल्ला यांसारख्या ऐतिहासिक आणि निसर्गरम्य स्थळांचा पर्यटनस्थळ म्हणून विकास झाल्यास राज्यभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यास मोठी मदत होईल. यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल आणि सोयगाव तालुक्याच्या आर्थिक विकासालाही मोठी गती मिळेल.
रुद्रेश्वर लेणी, वाडी किल्ला, गंगाधार धबधबा आणि जंजाळा किल्ला ही स्थळे लवकरच विकसित पर्यटनस्थळांच्या नकाशावर झळकतील, अशी आशा व्यक्त होत असून सोयगावच्या पर्यटन विकासासाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.







