नोंदणी कार्यालयांच्या कामकाजाचा खासदार भूमरे घेणार आढावा; नागरिकांच्या तक्रारी खासदार कार्यालयात सादर करण्याचे आवाहन
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक (रजिस्ट्री) कार्यालयांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी खासदार संदिपान भूमरे यांच्या पुढाकाराने दि. 28 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जिल्ह्यातील दस्तऐवज नोंदणी, नागरिकांना मिळणाऱ्या सेवा, नोंदणी प्रक्रियेतील अडचणी तसेच विविध तक्रारींचा आढावा घेण्यात येणार आहे.
नागरिक, शेतकरी, व्यावसायिक तसेच विविध घटकांच्या मालमत्ता व्यवहारांशी संबंधित दस्तऐवजांची नोंदणी ही अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. या माध्यमातून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होत असतो. मात्र, नोंदणी कार्यालयांमध्ये नागरिकांना येणाऱ्या अडचणी, विलंब, कागदपत्रांबाबतच्या समस्या, नोंदणी प्रक्रियेतील अडथळे किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या तक्रारी असल्यास त्या थेट या आढावा बैठकीत मांडता याव्यात, यासाठी खासदार भूमरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
*नागरिकांनी तक्रारी 25 ऑगस्ट पर्यन्त खासदार कार्यालयात सादर कराव्यात*
जिल्ह्यातील दुय्यम निबंधक (रजिस्ट्री) कार्यालयांशी संबंधित कोणतीही तक्रार, समस्या किंवा महत्त्वाची माहिती नागरिकांकडे असल्यास त्यांनी ती लेखी स्वरूपात खासदार संदिपान भूमरे यांच्या कार्यालयात 25 ऑगस्ट 2026 पर्यन्त आणून सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी आपल्या तक्रारीसोबत उपलब्ध असलेली संबंधित कागदपत्रे, अर्ज, पावत्या, नोंदणी कागदपत्रे अथवा इतर पुरावे जोडल्यास त्या समस्येचा बैठकीत सविस्तर पाठपुरावा करता येणार आहे. नागरिकांनी दिलेल्या तक्रारी व समस्यांची संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडणी करून त्यावर योग्य ती कार्यवाही व निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
नागरिकांच्या अडचणी थेट प्रशासनासमोर मांडून त्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची ठरणार असून, संबंधित नागरिकांनी आपापल्या तक्रारी व समस्या खासदार कार्यालयात सादर कराव्यात, असे आवाहन खासदार संदिपान भूमरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.





