मंत्रालयात घुसून आंदोलनाचा इशारा; दाते-पाटील यांचे आमरण उपोषण स्थगिती
दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : शाश्वत मराठा आरक्षणासह विविध न्याय्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुरू असलेले ज्येष्ठ अभ्यासक डॉ. राजेंद्र दाते-पाटील यांचे १६ दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) जलसंपदा मंत्री डॉ. गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने स्थगित करण्यात आले. शासनाच्या स्तरावर मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
डॉ. दाते-पाटील हे गेल्या १६ दिवसांपासून विभागीय आयुक्तालयासमोर उपोषणाला बसले होते. विविध मंत्री, आमदार, खासदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली होती. मात्र, मराठा समाजाच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका दाते-पाटील यांनी घेतली होती.
सोमवारी मंत्री डॉ. गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाल्यानंतर सकारात्मक तोडग्याच्या दिशेने पाऊल पडले. दाते-पाटील यांची प्रकृती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाची बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले.
हैदराबाद गॅझेटिअरच्या आधारे जातप्रमाणपत्राबाबत पुनर्तपासणी
मराठवाड्यातील मराठा समाजातील ज्या व्यक्तींकडे कुणबी नोंद किंवा वंशावळ उपलब्ध नाही, त्यांना हैदराबाद गॅझेटिअरच्या आधारे जातप्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेबाबत शासन निर्णय आणि एसओपीची घटनात्मक पातळीवर पुनर्तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय उपायुक्त डॉ. मंजुषा मिसकर यांनी दिली.
कायगाव येथे ‘मराठा क्रांती हुतात्मा स्तंभ’
मराठा आरक्षण आंदोलनात जलसमाधी घेऊन बलिदान देणारे हुतात्मा काकासाहेब शिंदे तसेच आरक्षणाच्या लढ्यात बलिदान देणाऱ्या ३८४ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ कायगाव येथे ‘मराठा क्रांती हुतात्मा स्तंभ’ उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी महसूल विभागाची एक एकर जागा आणि पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत कृती आराखडा तयार करून मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.
हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून देय आर्थिक मदत देण्यासाठीही पुढील १५ दिवसांत प्रस्ताव मंजूर करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या सुमारे १३ हजार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुढील एका महिन्यात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक आदेश देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
इतर मागण्यांबाबतही शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भातील लेखी पत्र डॉ. राजेंद्र दाते-पाटील यांना देण्यात आल्यानंतर विभागीय आयुक्तांच्या वतीने तहसीलदार के. के. भदाणे यांनी ज्यूस पाजून उपोषणाची सांगता केली.
यावेळी डॉ. ऋषिकेश कांबळे, राजेश मुंढे, मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. शिवानंद भानुसे, लक्ष्मणबापू शिरसाठ, योगेश शेळके धामोरीकर, सुनील कोटकर, रवींद्र वाहटुळे, रेखा वाहटुळे, संदीप पाटील, अमित जाधव, निखिल काकडे, विजय काकडे आणि आर्यन दाते यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल
सलग १६ दिवसांच्या उपोषणामुळे डॉ. राजेंद्र दाते-पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत होणाऱ्या बैठकीकडे आता मराठा क्रांती मोर्चाचे लक्ष लागले आहे.
“फसवणूक केल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन”
शासनाने दिलेली आश्वासने पाळली नाहीत किंवा मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांबाबत फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक योगेश शेळके धामोरीकर, लक्ष्मणबापू शिरसाठ आणि सुनील कोटकर यांनी दिला.
“शासनाने मागण्यांबाबत फसवणूक केल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू,” असा इशाराही त्यांनी दिला. मराठा समाजाच्या न्याय्य, कायदेशीर आणि घटनात्मक मागण्या पूर्ण होईपर्यंत लोकशाही मार्गाने संघर्ष सुरूच ठेवण्याची भूमिका यावेळी पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केली.
#मराठा_क्रांती_मोर्चा #राजेंद्र_दाते_पाटील #योगेश_शेळके_धामोरीकर #गिरीश_महाजन #देवेंद्र_फडणवीस #मराठा_आरक्षण #छत्रपती_संभाजीनगर #दैनिक_शब्दमत





