बोगस रजिस्ट्री प्रकरण: दोषी दुय्यम निबंधकावर तात्काळ निलंबनाची कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
छ संभाजीनगर/ प्रतिनिधी (दैनिक शब्दमत):
सोयगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात घडलेल्या ‘बोगस रजिस्ट्री’ प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष बैठकीत जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या वेळी सोयगावच्या प्रभारी दुय्यम निबंधकाने केलेले नियमबाह्य व्यवहार आणि शासकीय सुट्टीच्या दिवशी कार्यालय उघडून केलेली दस्तनोंदणी यावर तीव्र ताशेरे ओढत संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महसूल बुडवणाऱ्यांवर कठोर कारवाई
बोगस दस्त तयार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होत असतानाच, असे बेकायदेशीर दस्त अधिकृतरीत्या नोंदवणाऱ्या निबंधक अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. तुकडेबंदी कायद्याचे थेट उल्लंघन करणे, मालमत्तेचे कमी मूल्यांकन दाखवणे आणि शासनाचा महसूल बुडवणे अशा सर्व संशयास्पद व्यवहारांची सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
कारभारात पारदर्शकता आणि दलालांना चाप
सर्वसामान्यांना दस्तनोंदणीसाठी नाहक त्रास सहन करावा लागू नये, यासाठी नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. निबंधक कार्यालयातील दलालांचा हस्तक्षेप समूळ नष्ट करणे आणि नागरिकांचे हेलपाटे थांबवणे यावर प्रशासनाने भर दिला आहे.
“बोगस रजिस्ट्री आणि नियमबाह्य व्यवहार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. या गैरव्यवहारात दोषी आढळणाऱ्या प्रत्येक घटकावर कठोर कारवाई होईपर्यंत प्रशासकीय पातळीवर सतत पाठपुरावा केला जाईल.”





