ऑटो रिक्षांच्या मनमानी भाडेवसुलीला लगाम लावा; शाहगंज ते नारेगाव व धूत हॉस्पिटल मार्गावर शहर बस सुरू करा
I.S.L.A.M. पार्टीच्या महिला शहराध्यक्ष जकिरा पठाण यांची प्रशासनाकडे मागणी
छत्रपती संभाजीनगर: दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
शहरातील अनेक भागांत ऑटो रिक्षाचालकांकडून मीटरप्रमाणे भाडे न आकारता प्रवाशांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. मनमानी पद्धतीने भाडेवसुली होत असल्याच्या तक्रारी नागरिक सातत्याने करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी ‘शाहगंज ते नारेगाव’ आणि ‘शाहगंज ते धूत हॉस्पिटल’ या मार्गांवर तातडीने शहर बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी आग्रही मागणी इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र (I.S.L.A.M.) पार्टीच्या महिला शहराध्यक्ष जकिरा नाजेखान पठाण (शकीला पठाण) यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात जकिरा पठाण यांनी नमूद केले आहे की, शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण झाल्यामुळे आता वाहतुकीस पुरेशी जागा उपलब्ध आहे. त्यातच सध्या चालवल्या जाणाऱ्या शहर बसेसचा आकारही पूर्वीच्या तुलनेत लहान व सोयीस्कर आहे. त्यामुळे अरुंद किंवा गर्दीच्या मार्गांवरही बस चालवणे पूर्णपणे व्यवहार्य असून वाहतुकीच्या दृष्टीने याचा मोठा फायदा नागरिकांना होणार आहे.
या मार्गांवर बस सेवा सुरू करण्याची मागणी:
१. शाहगंज ते रोशन गेट, राम मंदिर, आझाद चौक मार्गे नारेगाव २. शाहगंज ते धूत हॉस्पिटल
सर्वसामान्य, विद्यार्थी व कामगारांना मिळणार मोठा दिलासा
सध्या रिक्षाचालकांच्या मनमानी भाड्यामुळे गरीब, मध्यमवर्गीय नागरिक, महिला, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार वर्गाचे आर्थिक हाल होत आहेत. जर वरील मार्गांवर शहर बस सेवा सुरू झाली, तर या सर्वांना सुरक्षित व अल्पदरात प्रवास करणे शक्य होईल. तसेच या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर प्रवासी उपलब्ध असल्याने शहर बस सेवेलाही चांगला आर्थिक महसूल मिळून ती फायदेशीर ठरेल, असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.
सार्वजनिक हित आणि नागरिकांची सोय लक्षात घेऊन संबंधित विभागाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी आणि बस सेवा सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी I.S.L.A.M. पार्टीचे संस्थापक असिफ शेख रशीद व राष्ट्रीय अध्यक्ष नवीद खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.





