सोयगावच्या बोगस रजिस्ट्री प्रकरणात मोठी कारवाई; प्रभारी दुय्यम निबंधक दीपक रावळकर निलंबित
छ संभाजीनगर दुय्यम निबंधक-२ कार्यालयात कारवाई का? नाही
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क छ संभजीनगर
खासदार संदिपान भूमरे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर नोंदणी महानिरीक्षकांचा आदेश; नियमबाह्य १७३ दस्तनोंदणीसह सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरू केल्याचा ठपका*
छत्रपती संभाजीनगर : सोयगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नियमबाह्य पद्धतीने दस्तनोंदणी, तुकडेबंदी व नोंदणी नियमांचे उल्लंघन, परवानगीशिवाय सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरू करून दस्तनोंदणी केल्याच्या गंभीर प्रकरणाची दखल घेत प्रभारी सह दुय्यम निबंधक तथा कनिष्ठ लिपिक दीपक एच. रावळकर यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी निलंबनाचा आदेश जारी केला आहे.
या कारवाईमुळे सोयगावच्या कथित ‘बोगस रजिस्ट्री’ प्रकरणाला आता निर्णायक वळण मिळाले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेताना खासदार संदिपान भूमरे यांनी या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्याची आक्रमक भूमिका घेतली होती. बोगस अथवा नियमबाह्य दस्तांची नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई का होत नाही, असा थेट सवाल त्यांनी प्रशासनासमोर उपस्थित केला होता.
*२५२ दस्त स्वीकारले, २५० दस्तांची नोंदणी*
नोंदणी विभागाच्या तपासणी अहवालानुसार, २७ जुलै २०२६ ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सोयगाव कार्यालयात २५२ दस्त नोंदणीसाठी स्वीकारण्यात आले. त्यापैकी २ दस्त कबुलीजबाबासाठी प्रलंबित ठेवण्यात आले असून २५० दस्तांची नोंदणी पूर्ण करण्यात आली.
यातील विशेष बाब म्हणजे ‘एक जिल्हा एक नोंदणी’ या योजनेअंतर्गत सोयगाव तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यांतील १७२ दस्तांची नोंदणी करण्यात आल्याचे तपासणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. एका दस्ताच्या नोंदणीवेळी शासनाचा महसूल बुडाल्याचेही निदर्शनास आल्याचे आदेशात नमूद आहे.
*रविवारी कार्यालय उघडून २०९ दस्तांची प्रक्रिया*
या प्रकरणातील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी संबंधित कार्यालयात नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात आल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्याने २०९ दस्तांवर आय-सरिता प्रणालीवर पंचवा शिक्का पूर्ण करून दस्तनोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्याचे आदेशात नमूद आहे.
शासकीय सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरू करून दस्तनोंदणीची प्रक्रिया राबविण्याचा प्रकार गंभीर मानण्यात आला आहे.
*खासदार भूमरे यांचा सवाल—‘दस्त नोंदविणाऱ्या अधिकाऱ्याची जबाबदारी कोणाची?’*
जिल्ह्यातील बोगस रजिस्ट्री आणि नियमबाह्य दस्तनोंदणीच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर खासदार संदिपान भूमरे यांनी प्रशासनासमोर अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते.
“बोगस दस्त तयार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होतो; मात्र तो दस्त अधिकृतरीत्या नोंदविणाऱ्या अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित का होत नाही?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
दस्तनोंदणी करताना संबंधित अधिकाऱ्याने नियम व कायद्यांची पूर्तता तपासणे आवश्यक असताना नियमबाह्य दस्तांची नोंदणी झाल्यास संबंधित अधिकाऱ्याची भूमिका तपासली पाहिजे, अशी भूमिका भूमरे यांनी मांडली होती.





