काळिज पिळवटणारी घटना: अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
बीड/जालना (विशेष प्रतिनिधी): दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लाखो समर्थक दाखल झाले आहेत. दरम्यान, आंदोलनस्थळीच बीड जिल्ह्यातील एका मराठा आंदोलकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे अंतरवाली सराटीसह संपूर्ण मराठा आंदोलकांमध्ये शोककळा पसरली आहे.
दशरथ रायकर असे मृत आंदोलकाचे नाव
मिळालेल्या माहितीनुसार, मृत आंदोलकाचे नाव दशरथ रायकर (वय अंदाजे) असे असून ते बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील संगम गावचे रहिवासी होते. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि मराठा आरक्षणाच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी ते अंतरवाली सराटी येथे आले होते.
झोपेतच प्राणज्योत मालवली
रात्री उशिरा आंदोलनाच्या ठिकाणी असलेल्या एका शेतात दशरथ रायकर झोपले होते. सकाळी खूप वेळ झाला तरी ते उठत नसल्याचे परिसरातील इतर आंदोलकांच्या लक्षात आले. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून अंबड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.
आंदोलनस्थळी हळहळ
सलग सहा दिवसांपासून उपोषण सुरू असतानाच या दुर्दैवी घटनेने आंदोलनस्थळ सुन्न झाले आहे. “हा मराठा समाजासाठी आणि आमच्या आंदोलनासाठी अत्यंत दुःखाचा प्रसंग आहे,” अशा भावना व्यक्त करत मनोज जरांगे पाटील यांच्यासह उपस्थित आंदोलकांनी रायकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. या घटनेमुळे परिसरात अत्यंत गंभीर आणि शोकाकुल वातावरण निर्माण
झाले आहे.





