नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा!
वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड
विशेष प्रतिनिधी | दैनिक शब्दमत
छत्रपती संभाजीनगर:
समृद्धी महामार्गावरील हडसपिंपळगावजवळ वाहनचालकाला अडवून लुटणाऱ्या आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीचा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. वेशांतर, बनावट नोकरीचे आमिष आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) मदतीने चार फरार आरोपींना शिताफीने अटक केली. या कारवाईमुळे या दरोडा प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या ११ वर पोहोचली आहे.
काय आहे प्रकरण?
गेल्या २६ ऑगस्ट रोजी समृद्धी महामार्गावरील एक्झिट क्र. १८ जवळ राहुरी (जि. अहिल्यानगर) येथील एका वाहनचालकाला लुटण्यात आले होते. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी यापूर्वी ७ आरोपींना अटक केली होती, मात्र इतर आरोपी सातत्याने ठिकाणे बदलून पोलिसांना गुंगारा देत होते.
नाट्यमय रीतीने बीडमधून ओमकार फसलेला अटक
फरार आरोपी ओमकार रामचंद्र फसले (वय २२, रा. म्हाळस जवळा, जि. बीड) हा गावातच लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो चालक असल्याने पोलिसांनी स्वतःचा बनावट परिचय ठेकेदार म्हणून दिला. गावातील एका पानटपरीवर जाऊन पोलिसांनी ‘उड्डाणपुलाच्या कामासाठी टिपर चालकाची गरज असून चांगला पगार मिळेल’ अशी चर्चा सुरू केली. पानटपरी चालकाने ओमकारच्या मित्राला फोन करून या नोकरीबद्दल सांगितले. चांगल्या पगाराच्या आमिषाने ओमकार स्वतःहून पानटपरीवर आला. तो येताच ठेकेदाराच्या वेशातील पोलिसांनी त्याची ओळख पटवून त्यास जागीच ताब्यात घेतले.
अहिल्यानगर रोडवर सापळा अन् तिघे जाळ्यात
दुसऱ्या एका कारवाईत पोलिसांनी कायगाव टोका परिसरात सापळा रचून भिमराव उर्फ शहादेव भगवान तांदळे (वय २६, रा. पाथर्डी) आणि सुनील गणपत चव्हाण (वय २२, रा. गेवराई) या दोघांना ताब्यात घेतले.
त्याचप्रमाणे, टोळीला गुन्ह्यासाठी वाहन पुरवणारा आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकावर गाडी घालून गुटख्याचा टेम्पो पळवून नेणारा सराईत गुन्हेगार सुनील कल्याण शेंडगे (वय २६, रा. रांजणगाव शेणपुंजी) याला छत्रपती संभाजीनगर शहरातील तिसगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले. शेंडगे हा गेल्या ३ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.
दरोडेखोरांची संपूर्ण टोळी गजाआड
यापूर्वी परशुराम गायकवाड, किरण गायकवाड, करण जाधव, अनिल जाधव, पंडित लष्करे, ज्ञानेश्वर जाधव आणि उमेश गायकवाड यांना अटक करण्यात आली होती. नवीन ४ आरोपींच्या अटकेमुळे या गुन्ह्यातील सर्व ११ आरोपी आता पोलिसांच्या कोठडीत आहेत.
ही धडक कामगिरी पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत व त्यांच्या पथका
ने पार पाडली.





