पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल
विशेष प्रतिनिधी | दैनिक शब्दमत
पाचोड:
गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा करून चोरटी वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांविरुद्ध पाचोड पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पारुंडी शिवारामध्ये रविवारी (दि. ६) करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी टाटा मिनी हायवा आणि वाळूसह एकूण १० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारुंडी शिवारातील गट क्रमांक ७३ मध्ये विनाक्रमांकाच्या पिवळ्या रंगाच्या टाटा मिनी हायवा वाहनातून बेकायदेशीर वाळूची वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती पाचोड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ छापा टाकून पाहणी केली असता, हिरडपुरी शिवारातील गोदावरी नदीपात्रातून कोणत्याही वैध परवान्याशिवाय किंवा रॉयल्टीशिवाय अंदाजे दोन ब्रास वाळू चोरी करून नेली जात असल्याचे उघडकीस आले.
या कारवाईत पोलिसांनी १० लाख रुपये किमतीचा विनाक्रमांक टाटा मिनी हायवा आणि १० हजार रुपयांची दोन ब्रास वाळू, असा एकूण १० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला.
या आरोपींवर झाली कारवाई
या प्रकरणी राहुल गंगाराम कुऱ्हाडे, सोहेल अन्वर शेख आणि गौरव विनोद डुकळे हे आरोपी वाहनाचे मालक गणेश भागाजी डुकळे यांच्या वाहनातून, आरोपी संदीप छबुराव डुकळे याच्या सांगण्यावरून ही वाळू चोरी करत असल्याचे तपासात समोर आले आहे. या पाचही आरोपींविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात (गु.र.नं. ३७४/२०२६) भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ४९, ३(५) सह केंद्रीय मोटार वाहन कायदा कलम ५० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर धडक कारवाई पाचोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल साबळे (बकल नंबर ७८२), पोलीस अंमलदार सानप (बकल नंबर १६९१) आणि आयनले यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार साबळे क
रत आहेत.





