सार्वजनिक बांधकामाचा प्रताप: महिन्याभरातच प्रवेशद्वारावरील ‘माँ साहेब’ शब्द गळून पडला!
संभाजी सेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; संबंधित एजन्सी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
छत्रपती संभाजीनगर (विशेष प्रतिनिधी): दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
जालना रोडवरील कॅम्ब्रिज चौकात नुकत्याच उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वारावर ‘माँ साहेब जिजाऊ प्रवेशद्वार, छत्रपती संभाजीनगर’ असे नाव देण्यात आले होते. मात्र, हे प्रवेशद्वार उभारून अवघा एक महिना उलटत नाही तोच, या फलकावरील ‘माँ साहेब’ हे नाव गळून पडल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा आणि निष्काळजीपणाचा पर्दाफाश झाला असून, संभाजी सेनेच्या वतीने या विरोधात तीव्र रोष व्यक्त करत सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन सादर करण्यात आले आहे.
जालना – छत्रपती संभाजीनगर हा मुख्य रस्ता दोन जिल्ह्यांना जोडणारी महत्त्वाची वाहिनी आहे. या रस्त्याने शहरात प्रवेश करताना कॅम्ब्रिज चौक लागतो, जिथून बीड बायपास आणि सांवगी-हर्सूलकडे रस्ते जातात. अशा अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जननी ‘माँ साहेब जिजामाता’ यांच्या सन्मानार्थ हे भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले होते.
परंतु, अवघ्या एका महिन्यातच या नामावळीतील ‘माँ साहेब’ हा शब्द गळून पडल्यामुळे समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणा झाला असून, संबंधित अभियंता, कंत्राटदार आणि एजन्सी यांच्या मिलीभगतीमुळेच हे काम अत्यंत बोगस झाले आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
संभाजी सेनेच्या मागण्या:
१. बोगस कामाची आणि झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात यावी.
२. संबंधित कंत्राटदार/एजन्सीचा परवाना रद्द करून त्यांना काळ्या यादीत (Blacklist) टाकावे.
३. जबाबदार कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांना शासन सेवेतून तातडीने निलंबित/बडतर्फ करण्यात यावे.
४. प्रवेशद्वारावरील नावाची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी.
> आंदोलनाचा इशारा:
> जर या प्रकरणी तात्काळ योग्य कायदेशीर कारवाई केली नाही आणि दोषींवर कठोर पावले उचलली नाहीत, तर संभाजी सेनेच्या वतीने लोकशाही मार्गाने आमरण उपोषण व तीव्र निदर्शने करण्यात येतील, असा इशारा संभाजी सेनेचे शहर जिल्हा अध्यक्ष राजू शिंदे पाटील यांनी दिला आहे.
>
निवेदनावर संभाजी सेनेचे शहर जिल्हा अध्यक्ष राजू शिंदे पाटील, सुरेश ढवले पाटील, बद्री बकाल पाटील, योगेश दहीहंडे पाटील, अशोक थोरात, विजय धावगडे, बालाजी हिवाळे, सचिंव दाभाडे, विनोद दिवेकर, अशोक नाडे, शेखर हजारे, शिवाजी करवंदे, रमेश हिवाळे, अनिल आंबेकर, बाळासाहेब मदन, प्रदीप अधिकार, राजू वळेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या
स्वाक्षऱ्या आहेत.







