विदेशी नागरिकांच्या वास्तव्याची माहिती २४ तासांत देणे बंधनकारक
माहिती लपविणाऱ्या निवासस्थान व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल होणार; छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांचा इशारा
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर, दि. २६ सप्टेंबर २०२६ :
भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि कायदेशीर सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट २०२५ तसेच इमिग्रेशन अँड फॉरेनर्स रूल्स २०२५ मधील तरतुदींनुसार विदेशी नागरिकांच्या वास्तव्याची माहिती संबंधित निवासस्थान व्यवस्थापकांनी पोलिस प्रशासनाकडे विहित पद्धतीने सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, जिल्ह्यातील हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस, रिसॉर्ट, पेइंग गेस्ट, होम-स्टे तसेच अन्य निवासव्यवस्था चालकांनी त्यांच्या आस्थापनात विदेशी नागरिक वास्तव्यास आल्यास त्यांची आवश्यक माहिती नोंदवून २४ तासांच्या आत ऑनलाइन पोर्टल अथवा डिजिटल माध्यमातून सादर करणे आवश्यक आहे.
तसेच विदेशी नागरिकांच्या आगमनाची आणि निर्गमनाची नोंदही २४ तासांच्या आत करून ती संबंधित प्रणालीवर सादर करणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आगमनाची तारीख, वेळ तसेच त्यानंतर तो नागरिक कोणत्या ठिकाणी जाणार आहे, यासंबंधीची आवश्यक माहितीही विहित नमुन्यात नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शासकीय पोर्टलवर माहिती सादर करण्याचे निर्देश
सदर माहिती शासकीय इमिग्रेशन पोर्टल, e-FRRO/Form III किंवा निर्धारित डिजिटल माध्यमातून वेळेत सादर करावी. या प्रक्रियेशी संबंधित इलेक्ट्रॉनिक नोंदी सुरक्षितपणे जतन करणे आवश्यक असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून मागणी झाल्यास त्या नोंदी तपासणीसाठी उपलब्ध करून देणे ही निवासस्थान व्यवस्थापकांची जबाबदारी राहणार आहे.
पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी जिल्ह्यातील सर्व हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस, रिसॉर्ट, पेइंग गेस्ट, होम-स्टे व अन्य निवासस्थान चालकांना आवाहन केले आहे की, विदेशी नागरिक आपल्या आस्थापनात वास्तव्यास आल्यास त्यांची आवश्यक माहिती अचूकपणे नोंदवून विहित मुदतीत ऑनलाइन सादर करावी. तसेच त्यांच्या आगमनानंतर निर्गमनाची नोंदही वेळेत करावी.
माहिती लपविल्यास कायदेशीर कारवाई
विदेशी नागरिकांच्या वास्तव्याची माहिती नोंदविण्यात कसूर करणे, विहित मुदतीत माहिती सादर न करणे, माहिती लपविणे किंवा चुकीची अथवा अपूर्ण माहिती देणे, तसेच इमिग्रेशन अँड फॉरेन्स रूल्स २०२५ व इमिग्रेशन अँड फॉरेन्स ॲक्ट २०२५ मधील तरतुदींचे उल्लंघन करणे निदर्शनास आल्यास संबंधित निवासस्थान व्यवस्थापकांविरुद्ध कायद्यानुसार गुन्हा दाखल करून दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आला आहे.
राष्ट्रीय सुरक्षा आणि कायदेशीर सुव्यवस्थेच्या दृष्टीने या नोंदी अत्यंत महत्त्वाच्या असल्याने जिल्ह्यातील सर्व संबंधित निवासस्थान व्यवस्थापकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस प्रशासनाने केले आहे.







