SPA उभारण्याचे आश्वासन १२ वर्षांनंतरही अपूर्ण; इम्तियाज जलील यांचा सरकारला आंदोलनाचा इशारा
जटवाडा रस्त्यावरील एमटीडीसीच्या १०० एकरांहून अधिक जमिनीवर SPA उभारण्याची मागणी
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : शहरात राष्ट्रीय दर्जाची शैक्षणिक संस्था उभारण्याबाबत डिसेंबर २०१४ मध्ये देण्यात आलेले आश्वासन जवळपास १२ वर्षांनंतरही पूर्ण झाले नसल्याचा आरोप करत इम्तियाज जलील यांनी सरकारकडे SPA (स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर) स्थापन करण्याची मागणी केली आहे. हे आश्वासन पूर्ण न झाल्यास सरकारविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
जलील यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये आमदार असताना त्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरासाठी भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, महाराष्ट्रातील पहिली आयआयएम नागपूर येथे सुरू करण्याची घोषणा झाल्यानंतर मराठवाड्यात नाराजी निर्माण झाली होती. त्यानंतर हा मुद्दा त्यांनी विधानसभेत मांडला. डिसेंबर २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सभागृहात शहराला राष्ट्रीय दर्जाची दुसरी संस्था म्हणून SPA देण्याचे आश्वासन दिल्याचे जलील यांनी नमूद केले.
जटवाडा रस्त्यावरील जागेचा प्रस्ताव
छत्रपती संभाजीनगरमधील जटवाडा रस्त्यावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) मालकीची १०० एकरांहून अधिक जमीन उपलब्ध असून, या जागेवर SPA उभारण्यात यावे, असा प्रस्ताव जलील यांनी मांडला आहे. यापूर्वी ही जमीन गोल्फ कोर्स उभारण्यासाठी एका खासगी कंपनीला देण्यात आली होती. मात्र, जागा अनुपयुक्त असल्याचे आढळल्याने संबंधित प्रकल्प रद्द झाल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक तरुणांना मिळणार शिक्षण आणि रोजगाराच्या संधी
छत्रपती संभाजीनगर शहराकडे बहुराष्ट्रीय कंपन्यांसह विविध मोठ्या कंपन्या आकर्षित होत आहेत. अशा परिस्थितीत शहरात आयआयटी किंवा SPA सारखी राष्ट्रीय दर्जाची शैक्षणिक संस्था सुरू झाल्यास स्थानिक तरुणांना दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी मिळेल. तसेच तांत्रिक व व्यावसायिक क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होईल, असे जलील यांनी म्हटले आहे.
आश्वासन पूर्ण करण्याची मागणी
विधानसभेच्या सभागृहात देण्यात आलेले आश्वासन हे मराठवाड्यातील जनतेला दिलेले वचन असल्याचे जलील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सरकारने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन SPA स्थापन करण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आश्वासनाची पूर्तता झाली नाही, तर सरकारविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
या मागणीसंदर्भातील पत्राच्या प्रती राज्याचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.







