कप केकमध्ये रबर-प्लास्टिकचे तुकडे आढळल्याची तक्रार; रॉयल बेकर्सचा परवाना निलंबित
अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; एफडीएची धडक कारवाई
छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील रॉयल बेकर्स अँड कन्फेक्शनर्स या बेकरीमध्ये गंभीर अनियमितता आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बेकरीचा परवाना निलंबित केला आहे. कप केकमध्ये रबर आणि प्लास्टिकचे तुकडे आढळल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने ७ ऑक्टोबर रोजी बेकरीची अचानक तपासणी केली. या तपासणीत अस्वच्छतेसह अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले.
तपासणीत अनेक त्रुटी उघड
प्राप्त माहितीनुसार, बेकरीतील उत्पादन आणि स्वच्छतेच्या व्यवस्थेची तपासणी करताना अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या. अन्नपदार्थ आणि पाण्याच्या गुणवत्तेबाबतचे प्रयोगशाळा अहवाल उपलब्ध नव्हते. तसेच पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचे फूड-ग्रेड प्रमाणपत्रही आढळले नाही.
बेकरीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी आणि लसीकरण करण्यात आले नसल्याचेही तपासणीत समोर आले. कामगार अॅप्रन, हातमोजे आणि डोक्यावर टोपी न घालता काम करत असल्याचे आढळले. याशिवाय, कचरा उघड्यावर ठेवण्यात आला होता, तर कीटकांचा प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या जाळ्यांचाही अभाव होता.
परवाना निलंबित; त्रुटी दूर करण्याचे निर्देश
बेकरीतील अस्वच्छता आणि अन्नसुरक्षेशी संबंधित गंभीर त्रुटी लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने बेकरीचा परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित बेकरी चालकाला आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करून त्याबाबतचे पुरावे आणि अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
निलंबनाच्या कालावधीत बेकरीच्या कामकाजावर प्रशासनाकडून देखरेख ठेवण्यात येणार आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेशी तडजोड होऊ नये आणि ग्राहकांना सुरक्षित खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी अन्नसुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे खाद्यपदार्थ उत्पादक आणि विक्रेत्यांनी स्वच्छता व गुणवत्तेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.







