हप्ता देण्यास नकार दिल्याने व्यापाऱ्यावर चाकूहल्ला; हत्येचा प्रयत्न
“आम्ही या परिसरातील डॉन आहोत’ म्हणत धमकी; मुकुंदवाडी रेल्वेस्थानक परिसरातील घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर :** दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने आयुर्वेदिक मेडिकल चालकावर चाकूने वार करून हत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मुकुंदवाडी रेल्वेस्थानक रस्त्यावर शनिवारी दुपारी सुमारे १.३० वाजेच्या सुमारास घडली. ‘आम्ही या परिसरातील डॉन आहोत, पैसे दिले नाहीत तर जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी देत तिघांनी व्यापाऱ्याला मारहाण केली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी तिघा संशयित आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना १५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दुकानात घुसून व्यापाऱ्यावर हल्ला
मुकुंदवाडी रेल्वेस्थानक रस्त्यावरील ‘प्रभू सेवा आयुर्वेदा’ या दुकानाचे चालक मिथुन अशोक जैस्वाल (वय ४२, रा. पारिजातनगर, सिडको एन-४) हे शनिवारी दुपारी नेहमीप्रमाणे दुकानात काम करत होते. याचवेळी जयभवानीनगर येथील वैभव शिंदे, विजय जगताप आणि कार्तिक बामणे हे तिघे दुकानात आले.
आरोपानुसार, वैभव याने दुकानातील खुर्ची उचलून जैस्वाल यांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. जैस्वाल यांनी तो वार हाताने अडवून कारण विचारले. त्यानंतर विजय याने दारू पिण्यासाठी पैसे देण्याची मागणी करत पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याचदरम्यान वैभव याने कमरेला असलेला चाकू काढून जैस्वाल यांच्या पोटाच्या उजव्या बाजूला वार केला.
### रक्तबंबाळ अवस्थेतही लाथाबुक्क्यांनी मारहाण
चाकूचा वार झाल्याने जैस्वाल रक्तबंबाळ होऊन खाली कोसळले. तरीही हल्लेखोरांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर दुकानाच्या गल्ल्यातील १ हजार २०० रुपये जबरदस्तीने काढून घेत आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
गंभीर जखमी जैस्वाल यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
### घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये भीती
भरदिवसा दुकानात घुसून व्यापाऱ्यावर चाकूने हल्ला करून रोख रक्कम लुटल्याच्या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर काही व्यावसायिकांनी भीतीपोटी आपली दुकाने बंद करून तेथून निघून गेल्याचे सांगण्यात येते. परिसरातील व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
### तिघांना अटक; गुन्हेगारी पार्श्वभूमीची चर्चा
या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत वैभव शिंदे, विजय जगताप आणि कार्तिक बामणे या तिघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता १५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
संशयित आरोपींपैकी काहींवर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींकडून भरदिवसा व्यापाऱ्यावर हल्ला झाल्याने अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.
**दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क**







