शेतकरी प्रश्नांवर काँग्रेसचा मोर्चा; पोलिसांकडून कलम १६८ अंतर्गत नोटीस
१४ ऑक्टोबर रोजी मोर्चाचे आयोजन; आचारसंहिता आणि जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सूचना
शेतकरी प्रश्नांवर काँग्रेसचा मोर्चा; पोलिसांकडून कलम १६८ अंतर्गत नोटीस
१४ ऑक्टोबर रोजी मोर्चाचे आयोजन; आचारसंहिता आणि जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सूचना
दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी मोर्चा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६८ अंतर्गत नोटीस बजावली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे नोटिशीत नमूद आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. यासंदर्भातील अर्ज सहाय्यक पोलीस आयुक्त, शहर विभाग यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
निवडणूक आचारसंहिता आणि जमावबंदीचा संदर्भ
भारत निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत शहरात आदर्श आचारसंहिता लागू केल्याचा उल्लेख नोटिशीत करण्यात आला आहे. तसेच, छत्रपती संभाजीनगर शहरात ३० सप्टेंबर २०२६ पासून महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार जमावबंदीचे आदेश लागू असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
सध्या विविध पक्ष व संघटनांच्या वतीने आंदोलने सुरू असल्याने मोर्चात असामाजिक तत्त्वांचा शिरकाव होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मोर्चासाठी पोलिसांच्या सात प्रमुख सूचना
नोटिशीनुसार, मोर्चाच्या आयोजकांनी आणि कार्यकर्त्यांनी पुढील सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
१. मोर्चामध्ये चारचाकी वाहनांचा वापर करू नये.
२. मोर्चात कोणत्याही प्रकारचे जनावर किंवा पाळीव प्राणी सहभागी करू नयेत.
३. मोर्चादरम्यान कोणत्याही व्यक्तीने प्रतीकात्मक पुतळा दहन किंवा तत्सम प्रकार करू नये.
४. मोर्चातील घोषणा धोरणात्मक स्वरूपाच्या असाव्यात.
५. नवरात्रोत्सव सुरू असल्याने कोणत्याही धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची आयोजकांनी नोंद घ्यावी.
६. इतर पक्षांचे कार्यकर्ते किंवा नेते मोर्चात सहभागी होणार असल्यास त्यांनीही नोटिशीतील सूचनांचे पालन करावे, अशी माहिती देऊन त्यांना नियमांची जाणीव करून द्यावी.
७. मोर्चादरम्यान वरिष्ठ कार्यालयात जाणाऱ्या याकृत रुग्णवाहिका तसेच बंदोबस्तावरील अधिकाऱ्यांना अडथळा होणार नाही, याची काळजी घ्यावी. पोलिस बॅरिकेडिंग तोडणे किंवा लोटालोटी करणे यांसारखे प्रकार होणार नाहीत, याची आयोजकांनी दक्षता घ्यावी.
परवानगीच्या अटींचे पालन करण्याचे आवाहन
मोर्चासाठी देण्यात येणाऱ्या परवानगीतील अटी व शर्तींचे तंतोतंत पालन करूनच मोर्चा काढावा. मोर्चासंदर्भातील निवेदन व पदवीधर मतदारसंघाच्या आचारसंहितेचा विचार करता, निवेदन विभागीय आयुक्तांऐवजी जिल्हाधिकाऱ्यांना देण्याबाबतही नोटिशीत निर्देश आहेत.
नोटिशीतील सूचनांचे उल्लंघन झाल्यास आयोजक व कार्यकर्त्यांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १७२ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, तसेच नोटीस न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली जाऊ शकते, असा इशारा सहाय्यक पोलीस आयुक्त, शहर विभाग, छत्रपती संभाजीनगर यांनी दिला आहे.
ही नोटीस १३ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी करण्यात आली असून, ती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर आणि शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम सय्यद अब्बास यांना उद्देशून देण्यात आली आहे.







