प्रारुप प्रभाग रचनेवर डॉ. हुलगेश चलवादींचा आक्षेप पुणे महानगर पालिकेच्या उपायुक्तांना निवेदन प्रारूप प्रभाग रचना रद्द करण्याची मागणी

0
InShot_20250831_202623970

प्रारुप प्रभाग रचनेवर डॉ.हुलगेश चलवादींचा आक्षेप

 

पुणे महानगर पालिकेच्या उपायुक्तांना निवेदनौ

 

प्रारूप प्रभाग रचना रद्द करण्याची मागणी

पुणे:दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

दिनांक २९ ऑगस्ट २०२५, पुणे:-

 

सत्ताधारी पक्षाला लाभ पोहचवण्यासाठी कशाप्रकारे महानगर पालिकेची प्रारूप प्रभाग रचना करण्यात आल्या आहेत, याचे उदाहरण पुणे महानगर पालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवरून दिसून आले आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या प्रारूप प्रभाग रचनेवर बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी, माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांनी आक्षेप नोंदवला आहे.

 

यासंदर्भात शुक्रवारी (ता.२९) डॉ.चलवादी यांनी बसप शिष्टमंडळाचे नेतृत्व करीत पालिकेच्या निवडणूक विभागाचे उपायुक्त वसंत काटकर यांना निवेदन सादर करीत हरकत नोंदवली. पक्षाचे जिल्हा महासचिव प्रविण वाकोडे, अनिल त्रिपाठी तसेच शिवाजी नगर विधानसभा मतदार संघाचे पदाधिकारी किशोर अडागळे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

पुणे मनपाच्या प्रारुपानूसार सर्वच प्रभागांच्या रचना नैसर्गिक व भौगोलिक परिस्थितीने पुर्णपणे चुकीची असल्याचा बसपाचा आक्षेप आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेनूसार प्रभागामध्ये मतदारांची संख्या ३० ते ४० हजारांनी कमी-जास्त दिसून येते. यानूसार प्रारूप प्रभागांची रचना कायद्या विरूद्ध आहे, असा युक्तिवाद डॉ.चलवादी यांनी केला आहे.

 

पुण्याच्या मध्यवर्ती भागात स्थित पेठांमध्ये प्रारुप प्रभागांची रचना छोटी करून संख्या वाढवण्यात आली आहे. एका विशिष्ट विचारधारेच्या सत्ताधारी पक्षाला फायदा करून देण्यासाठी ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रारुप प्रभाग त्यांच्या सोयीचे करण्यात आले आहे.ही रचना पुर्णत: मतदारांच्या हक्काचे हनन करणारी असून देशद्रोहासारखे आहे, असे डॉ.चलवादी म्हणाले.

 

उलटपक्षी मनपाच्या उपनगरातील गावांचे रचनेनुसार २ किंवा अधिक तुकडे करून गावाच्या विकासामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न प्रभाग रचनेच्या माध्यमातून होत असल्याचे निरीक्षण डॉ.चलवादी यांनी नोंदवले. चुकीच्या पद्धतीने प्रभागांची रचना करण्यात आली आहे. प्रारुप प्रभागाची नावे निश्चित करतांना गावाप्रमाणे आणि नैसर्गिक नियमाने करणे अपेक्षित आहे. पंरतु, प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूपात चुकीचे नामकरण करण्यात आले आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या सक्षम उमेदवारांना अडचणीचे ठरू शकतात, अशा पद्धतीने प्रारूप प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आली असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

 

पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. सुशिक्षित, प्रामाणिक, कष्टकरी, मध्यमवर्गीय, आणि सर्व जातीधर्माचे नागरिक येथे गुण्यागोविंदाने नांदतात. सर्व नागरिकांचा सन्मान करीत देशाच्या संविधानाच्या अधिन राहून, घटनेला अभिप्रेत प्रभाग रचना करणे प्रशासनावर बंधनकारक आहे. अशात चुकीची प्रभाग रचना रद्द करीत योग्य प्रभाग रचना करण्याची मागणी डॉ.चलवादी यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *