स्मार्ट सिटी बस डेपोत ग्राहक डिझेल पंपाचे उद्घाटन; शहर बस सेवेसाठी महत्त्वाचे पाऊल
स्मार्ट सिटी बस डेपोत ग्राहक डिझेल पंपाचे उद्घाटन; शहर बस सेवेसाठी महत्त्वाचे पाऊल
छत्रपती संभाजीनगर
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
दि.०४ सप्टेंबर
जाधववाडी येथील स्मार्ट सिटी बस डेपोमध्ये डिझेल पंपाचे उद्घाटन गुरुवार, ४ सप्टेंबर रोजी करण्यात आले. मनपा आयुक्त, प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते हा पंप सुरू करण्यात आला. यामुळे शहरातील १०० डिझेल बसेसना इंधन पुरवठा करणे सोपे होणार आहे, जे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक कार्यक्षम आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनवण्यासाठी महत्त्वाचे आहे.
या पंपाद्वारे इंधन खरेदी केल्यामुळे स्मार्ट सिटीला दरमहा ३ ते ४ लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाची बचत होण्याची अपेक्षा आहे. सध्या स्मार्ट सिटीच्या १०० बसेससाठी दरमहा सुमारे १.५ लाख लिटर डिझेल लागते. या पंपासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या आणि तांत्रिक प्रक्रिया भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) ने पूर्ण केल्या आहेत, त्यामुळे स्मार्ट सिटीला यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागलेला नाही.
यावेळी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांच्यासह अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर संतोष वाहुळे, मुख्य चालन व्यवस्थापक संजय सुपेकर, लेखा अधिकारी अनिलदत्त कोथळीकर, सहाय्यक व्यवस्थापक प्रमोद देशमुख, सहाय्यक व्यवस्थापक विलास काटकर, डेपो मॅनेजर श्याम महाजन, प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा नायर, किरण आढे आणि अरिहंत गर्ग बीपीसीएल क्षेत्र व्यवस्थापक, छत्रपती संभाजीनगर हे उपस्थित होते.
यावेळी जी. श्रीकांत यांनी आगामी पीएमई बस सेवा प्रकल्प डेपोच्या कामाचा आढावा घेतला. तसेच, याठिकाणी मेकॅनिक, चालक, वाहक आणि बस कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृह, स्वच्छतागृह आणि आगामी इलेक्ट्रिक बससाठी चार्जिंग स्टेशनच्या कामासाठी इमारती बांधकामाची पाहणी केली.
