गुटखा माफिया लाला
जैस्वालला पोलिसांची छत्रछाया
आम आदमी पार्टीचे सुभाष बोर्डे यांचा पोलिस प्रशासनावर खडा सवाल
जालना (प्रतिनिधी) जालना शहरात व जिल्हाभरात गुटखा माफिया म्हणून नावारूपाला आलेला सतीश उर्फ लाला जयस्वाल हा माफिया खुलेआम विषाची पुडी लोकांपर्यंत पोहोचवत आहे. गुटखा विक्रीवर बंदी असतानाही कंटेनरवर कंटेनर जालन्यात उतरतात, बाजारपेठेत गुटखा खुलेआम विकला जातो, पण पोलिस मात्र गप्प बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे सुभाष बोर्डे यांनी संताप व्यक्त करत प्रशासनाला थेट सवाल केला आहे. लाला जयस्वालला अटक करण्यासाठी पोलीस प्रशासन माधार का घेत आहे? गुटखा माफिया पोलीस आशीर्वादाशिवाय एवढा मोकाट कसा फिरू शकतो. गुटखा विक्रीमुळे जिल्ह्यात कर्करोगाचे रुग्ण वाढत आहेत, तरुणाई व्यसनाधीन होत आहे, शालेय मुलांच्या हातातही विषाची पुडी पोहोचली आहे. ही जनतेच्या आरोग्याशी थेट खेळण्यासारखी गोष्ट असून जबाबदारी पोलीस प्रशासनावर येते, असा दावा आम आदमी पार्टीने केला आहे. आम आदमी पार्टीचे सुभाष बोर्डे यांनी स्पष्ट मागणी केली आहे की, गुटखा माफिया सतीश उर्फ लाला जयस्वालला तात्काळ अटक करावी. त्याच्या संपूर्ण गुटखा साम्राज्याचा शोध घेऊन, कोणते अधिकारी व राजकीय नेते त्याला पाठबळ देत आहेत हे उघड करावे. या प्रकरणाची चौकशी व्हावी. अन्यथा आम आदमी पार्टी नागरिकांसोबत रस्त्यावर उतरून पोलीस प्रशासनाविरुद्ध जोरदार आंदोलन उभारेल असा इशारा देखील बोर्डे यांनी दिली आहे.
हप्त्यांचे जाळे ?
शहरात जोरदार चर्चा आहे की, लाला जयस्वालच्या गुटखा साम्राज्याला पोलीस विभागातील काही ‘हप्तेखोर’ अधिकाऱ्यांचा थेट आशीर्वाद आहे. गुटखा व्यवसाय बेकायदेशीर असल्याने प्रत्येक दिवस हा गुन्हा आहे. तरीही पोलिसांकडून कारवाईचा अभाव म्हणजे हप्त्यांच्या देवाण-घेवाणीची दुर्गंधी स्पष्ट होते. गुटख्याने जनता मरतेय आणि पोलिस मात्र हप्त्याची मजा घेतायेत ! असा संताप बोर्डे यांनी व्यक्त केला.
सदर बाजार ठाण्याचे मौन
लालाचा गुटखा व्यवसाय हा सदर बाजार पोलीस ठाण्याच्या नाकावर टिच्चून मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ट्रक, टेम्पो व कंटेनरमधून दररोज अवैध गुटखा उत्तरतो. लहानसहान प्रकरणांत सामान्य नागरिकांना ताबडतोब अटक करणारे पोलिस अधिकारी मग लालासारख्या मोठ्या गुटखा माफियावर कारवाई करण्यास का कचरतात? यावरूनच नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे की गुटखा माफियाला जाणीवपूर्वक पोलीस संरक्षण दिले जात आहे का?
पोलीस अधीक्षकांचे मौन का ?
संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे की गुटखा माफियाला पोलीस अधीक्षकांपासून ते स्थानिक ठाण्यापर्यंत सर्वांचा मौन पाठींबा आहे का? सामान्य माणसावर कायदा कठोर, पण माफियावर मात्र पोलिसांचा मौनव्रत हा दुटप्पीपणा जनतेला अजिबात मान्य नाही. जर पोलीस प्रशासनाने गुटखा माफियावर कारवाई केली नाही, तर जनतेचा आक्रोश थेट पोलिसांवर धावून जाईल! असा इशारा आम आदमी पार्टीचे सुभाष बोर्डे यांनी दिला.