जेव्हा लग्नात अचानक पोलीस येतात…
जेव्हा लग्नात अचानक पोलीस येतात…
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
अहिल्यानगर (शेंडी) येथील तेलोरे परिवारामध्ये विवाहसोहळ्याचा आनंदोत्सव सुरू होता. लग्नाची धामधूम शिगेला पोहोचली होती. नवरीचे वडील आलेल्या पाहुण्यांचे प्रेमाने स्वागत करत होते. सर्वत्र हास्य, गडबड आणि मंगल वातावरण होते.
अचानक लग्नाला अवघा अर्धा तास बाकी असताना मंडपाच्या प्रवेशद्वाराशी एक पोलीस गाडी येऊन थांबली. क्षणातच उपस्थित सर्वांच्या नजरा त्या गाडीकडे वळल्या. काय घडले असेल, या विचाराने वातावरणात थोडीशी उत्सुकता आणि तणाव पसरला.
तेवढ्यात गाडीतून एकामागोमाग एक असे १० ते १५ पोलीस वर्दीत उतरले. पाहुण्यांची कुजबुज सुरू झाली. पण पुढच्याच क्षणी चित्रच बदलले…
त्या पोलीस गाडीतून ढोल, ताशे बाहेर काढण्यात आले आणि जोरदार नादात वादन सुरू झाले. मंगलमय तालावर संपूर्ण मंडप दुमदुमून गेला. पाहुण्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद एकाच वेळी झळकला. सर्वजण थक्क होऊन हा अनोखा सोहळा पाहत राहिले.
माहिती घेतल्यानंतर असे लक्षात आले की, पोलीस बॅण्ड पथक लग्नसमारंभासाठी उपलब्ध असते. त्यासाठी रितसर परवानगी घ्यावी लागते तसेच ठरलेली फीही जमा करावी लागते. मात्र हा अनुभव सर्वसामान्यांसाठी खरोखरच आगळा वेगळा आणि लक्षवेधी ठरला.
