सरपंच खुर्चीत महिला; स्वाक्षरी मात्र पतीची!
जाफ्राबाद तालुक्यात महिला सक्षमीकरणाचा बोजवारा
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
जाफराबाद | प्रतिनिधी : मोहम्मद बाईयाश
जाफ्राबाद तालुक्यात महिला सक्षमीकरणाच्या घोषणा केल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात ग्रामपंचायतींचा कारभार अनेक ठिकाणी सरपंच महिलांच्या पतींकडून चालवला जात असल्याचे वास्तव समोर येत आहे. तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींपैकी ३६ ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच कार्यरत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी निर्णयप्रक्रिया, बैठका आणि अधिकृत व्यवहारांमध्ये महिलांऐवजी त्यांच्या पतींचाच हस्तक्षेप वाढल्याची चर्चा गावागावात सुरू आहे.
तोंडोळी-गाडेगव्हाण गट ग्रामपंचायतीतील प्रकारामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. महिला राखीव जागेतून निवडून आलेल्या विद्यमान सरपंच अनिता ज्ञानेश्वर बनकर यांच्या नावाने ग्रामपंचायतीचा कारभार प्रत्यक्षात त्यांचे पती ज्ञानेश्वर सखाराम बनकर सांभाळत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, अधिकृत कागदपत्रांवर सरपंचांच्या नावाने स्वाक्षऱ्या करण्याचा अधिकार केवळ सरपंचांनाच असताना, त्यांच्या पतींकडून हुबेहूब स्वाक्षऱ्या केल्या जात असल्याचा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
तालुक्यात काही अपवाद वगळता बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच नामधारी असून प्रत्यक्ष कारभार पुरुष मंडळींकडूनच चालवला जात असल्याचे चित्र आहे. ग्रामसभा, मासिक बैठका, विकासकामांचे निर्णय तसेच शासकीय व्यवहारांमध्ये सरपंच पती किंवा घरातील अन्य सदस्यांचे वर्चस्व असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत आरक्षणानंतर या विषयावर गावागावात चर्चा रंगू लागली आहे. अनेक ठिकाणी सोशल मीडियावरील बॅनर, शुभेच्छा फलक आणि कार्यक्रमांच्या पत्रकांमध्ये सरपंच महिलांपेक्षा त्यांच्या पतींची नावे अधिक ठळकपणे झळकत असल्याचेही निदर्शनास येत आहे.
महिला आरक्षणाचा उद्देश महिलांना नेतृत्वाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा असला, तरी प्रत्यक्षात महिलांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग अत्यल्प असल्याने महिला सक्षमीकरण केवळ कागदोपत्रीच राहिले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शासन परिपत्रकाची प्रभावी अंमलबजावणी नाही
महिलांनी स्वतंत्रपणे ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळावा आणि पती किंवा इतर नातेवाईकांच्या हस्तक्षेपाला आळा बसावा यासाठी राज्य शासनाने वेळोवेळी परिपत्रके जारी केली आहेत. मात्र, प्रत्यक्ष व्यवहारात या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी महिला सरपंचांना सक्षम करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
> “ग्रामपंचायत कारभारात जर सरपंच महिलांच्या पतीकडून किंवा महिला सदस्यांच्या पतींकडून हस्तक्षेप होत असेल, तर संबंधितांनी पंचायत समिती कार्यालयात लेखी तक्रार दाखल करावी. अशा प्रकरणांची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. यासंदर्भात सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पुन्हा स्पष्ट सूचना देण्यात येणार आहेत.” — गिरीश सोनार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती जाफ्राबाद
> “महिला सक्षमीकरण केवळ आरक्षणापुरते मर्यादित राहू नये. सरपंच महिलांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा हक्क अबाधित राहिला पाहिजे. पती किंवा घरातील सदस्यांचा हस्तक्षेप हा लोकशाही प्रक्रियेचा अपमान आहे. शासनाने परिपत्रकांची प्रभावी अंमलबजावणी करून महिलांना खऱ्या अर्थाने नेतृत्वाची संधी द्यावी.” — समाधान पाटील भोपळे, सामाजिक कार्यकर्ते, देऊळझरी







