टेंभुर्णीत वानरांचा धुमाकूळः तीन जण गंभीर जखमी, वनविभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
जाफराबाद प्रतिनिधी मोहम्मद बाईयाश
येथे
गेल्या काही दिवसांपासून वानरांनी भयंकर हैदोस घातला असून, आता हे वानर थेट माणसांवर जीवघेणे हल्ले करत आहेत.
वानरांच्या टोळीने केलेल्या अचानक हल्ल्यात टेंभुर्णीतील तीन नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून, वारंवार तक्रारी करूनही वनविभाग याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपासून टेंभुर्णी गावात वानरांच्या विविध टोळ्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या टोळ्यांमध्ये अनेकदा नरवानरांमध्ये कडाक्याची भांडणे आणि झुंज रंगत आहे. या अत्यंत आक्रमक झालेल्या अवस्थेत वानरांच्या जवळून जर कोणी नागरिक गेले किंवा त्यांना दिसले, तर हे वानर थेट त्यांच्या अंगावर धावून
जाऊन चावा घेत आहेत.
अशाच एका अचानक झालेल्या हल्ल्यात टेंभुर्णी येथील विठ्ठल प्रल्हाद साळवे (वय ४५, व्यापारी), कैलास भोरे (वय ४६), चतुराबाई चव्हाण, तिघे जण वानराने घेतलेल्या तीव्र चाव्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत.
टनेनंतर जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना जालना येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मात्र, वानरांच्या या हिंसक रूपामुळे टेंभुर्णीतील ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. गल्लीबोळांत आणि घरांच्या छतावर वानरांचे टोळके ठिय्या मांडून बसत असल्याने लहान मुलांना घराबाहेर सोडणेही धोकादायक बनले आहे. शाळा आणि क्लासला जाणाऱ्या लहान
बालकांना या वानरांपासून मोठा जीवघेणा धोका निर्माण झाला आहे.
गावात एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असतानाही वनविभाग मात्र मूग गिळून बसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कोणाचा तरी बळी गेल्यावरच वनविभाग जागे होणार का? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
टेंभुर्णी गावाच्या वतीने वनविभागाकडे खालील मुख्य मागण्या करण्यात आल्या आहे. गावात धुमाकूळ घालणाऱ्या
आणि माणसांवर हल्ले करणाऱ्या आक्रमक वानरांना तातडीने पिंजरा लावून पकडण्यात यावे. या वानरांना पकडून दूरवरच्या दाट जंगलात सुरक्षितपणे सोडावे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी गावात विशेष पाहणी करावी. वनविभागाने पथक पाठवून
वनविभागाने या गंभीर प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन या उपद्रवी वानरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा टेंभुर्णी येथील ग्रामस्थांनी दिला आहे.











