वाघरुळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
जाफराबाद प्रतिनिधी : श्री रंगनाथ महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वाघरुळ (ता. जाफराबाद, जि. जालना) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. एम. एस. कोरडे सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. एन. एस. मोरे सर, तर विशेष अतिथी म्हणून प्रा. एस. डी. लेंडिकर, श्री. घोंगे सर आणि प्रा. श्रीमती राऊत मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्र, कार्य आणि विचारांवर प्रभावी भाषणे करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
प्रमुख अतिथी प्रा. एन. एस. मोरे सर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनाचा तसेच भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळक यांच्या योगदानाचा सविस्तर आढावा घेतला. सामाजिक, राजकीय आणि राष्ट्रविकासासाठी या महापुरुषांनी केलेल्या कार्याचा आदर्श प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारावा, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिस्त समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रा. के. एस. चव्हाण सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. भगत मॅडम यांनी केले.
यावेळी जी. एफ. सर आणि उगले सर यांचे विशेष कौतुक करण्यात आले.











