
गाडेगव्हाण रस्त्यावर चिखल अन् घाणीचे साम्राज्य! शाळकरी मुलांची जीवघेणी कसरत; ग्रामपंचायतीचे दुर्लक्षतक्रारीनंतरही तात्पुरत्या मलमपट्टीचा प्रयत्न; थेट सिमेंट रस्त्याची गावकऱ्यांची ठाम मागणी
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
जाफराबादप्रतिनिधी: मोहम्मद बाईयाश
“गाव तिथे रस्ता” अशा मोठ्या वल्गना शासन पातळीवर केल्या जातात, मात्र गाडेगव्हाण गावातील रस्त्यांची अवस्था पाहिल्यास विकासाचे अक्षरशः तीनतेरा वाजल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. गाडेगव्हाण ते टेंभुर्णीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्डे आणि गुडघाभर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या घाणीतून वाट काढताना शाळकरी मुलांना, वाहनचालकांना आणि ग्रामस्थांना मोठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. गावाच्या विकासाची जबाबदारी असलेली ग्रामपंचायत याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने गावकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दुचाकी घसरून अपघातांचे सत्र; स्कूल बस चालवताना कसरत
गाडेगव्हाण-टेंभुर्णी या मुख्य मार्गावरून दररोज शेकडो ग्रामस्थ, शेतकरी आणि शाळकरी मुलांची ये-जा असते. अनेक शाळांच्या बसेसही याच रस्त्यावरून धावतात. मात्र, रस्त्यावरील मोठमोठे खड्डे आणि साचलेल्या चिखलामुळे बस चालवताना चालकांची मोठी तारांबळ उडत आहे.
“एखाद्या दिवशी अपघाताने बस उलटली, तर मुलांच्या जिवाची जबाबदारी नक्की कोण घेणार?”
संतप्त पालकांचा सवाल
या मार्गावर दुचाकी घसरून पडण्याच्या घटना रोजच्याच झाल्या असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे चारचाकी वाहने चिखलात रुतून बसत असल्याने दररोज वाहतूक कोंडी आणि नागरिकांना मानसिक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
ग्रामपंचायतीला सोयरसुतक नाही; गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
रस्त्याची एवढी भयानक दुरावस्था झाली असतानाही गाडेगव्हाण ग्रामपंचायत प्रशासन याकडे पूर्णपणे डोळेझाक करत आहे. “ग्रामपंचायतीला गावाच्या समस्यांचे काही देणेघेणे आहे की नाही? लोकप्रतिनिधी नक्की कुठे झोपा काढत आहेत?” असा सवाल आता नागरिक उघडपणे विचारत आहेत.
माती-मुरुमाची तात्पुरती मलमपट्टी नको: दरवेळी तक्रार झाल्यावर केवळ मुरुम व माती टाकून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. पाऊस पडताच पुन्हा त्याचा चिखल होऊन परिस्थिती ‘जैसे थे’ होते.
सिमेंट काँक्रीट रस्त्याची मागणी: आता वेळ मारून नेण्याऐवजी या रस्त्याची कायमस्वरूपी कटकट मिटवण्यासाठी थेट ‘सिमेंट काँक्रीटचा रस्ता’ मंजूर करून काम सुरू करावे, अशी ठाम मागणी गावकऱ्यांनी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीत घोटाळ्यांचे सत्र सुरुच चेअरमन दीपक बनकर यांचा घणाघाती आरोप
ग्रामपंचायतीच्या या भोंगळ आणि कारभारावर सडकून टीका करताना गाडेगव्हाणचे चेअरमन श्री. दीपक गंगाधर बनकर यांनी थेट सरपंच आणि ग्रामसेवकाला धारेवर धरले आहे.
“गाडेगव्हाणमधील रस्त्यांची अतिशय दुर्दशा झाली असून शाळकरी मुलांचे प्रचंड हाल होत आहेत. सरपंच आणि ग्रामसेवक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. ग्रामपंचायतीमध्ये सध्या घोटाळ्यांवर घोटाळे सुरू असून आतापर्यंत गावात कोणतेही ठोस विकासकाम झाले नाही; फक्त खोटी कामे दाखवून बिले उचलण्याचे पाप या प्रशासनाने केले आहे.”
— दीपक गंगाधर बनकर (चेअरमन, गाडेगव्हाण)











