वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात
चिकलठाणा (विशेष प्रतिनिधी): दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
चिकलठाणा परिसरातील प्रभाग क्र. ९ मधील हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसातून तब्बल दोन ते तीन वेळेस वीज पुरवठा खंडित होत आहे. महावितरण अधिकाऱ्यांच्या भोंगळ्या कारभारामुळे व हलगर्जीपणामुळे स्थानिक नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तक्रारींची दखल नाही, अधिकारी फोन उचलत नाहीत
दररोज फीडरवरून वीज गायब झाल्यानंतर नागरिक तक्रार निवारण केंद्रात किंवा संबंधित अधिकाऱ्यांना फोन करतात; परंतु महावितरणचे अधिकारी फोन उचलत नाहीत. कार्यालयातील फोन नेहमी ‘बिझी’ दाखवतो, तर प्रत्यक्ष कार्यालयात गेले असता संबंधित कर्मचारी किंवा उपअभियंता हजर नसतात. स्थानिक नागरिकांनी याप्रकरणी अनेकदा तोंडी व लेखी स्वरूपात महावितरणकडे तक्रारी नोंदविल्या, परंतु त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.
मोठ्या दुर्घटना घडल्या; कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
सावित्री नगर, हिना नगर आणि पटेल नगर भागात महावितरणचे तंत्रज्ञ किंवा इलेक्ट्रिशियन कधीही फिरकत नाहीत. लाईन दुरुस्ती आणि देखभालीकडे सतत दुर्लक्ष होत असल्यामुळे यापूर्वी या भागात अनेक मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. वरिष्ठ अधिकारीही या प्रकाराकडे डोळेझाक करत असल्याने दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी तीव्र मागणी आता नागरिक करत आहेत.
जनप्रतिनिधींविरोधात संताप
या गंभीर समस्येकडे स्थानिक आमदार, खासदार आणि नगरसेवक पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यात लोकप्रतिनिधींना अपयश आल्यामुळे परिसरात लोकप्रतिनिधींविरोधातही प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
महावितरणच्या या गलथान कारभाराला कंटाळून त्रस्त झालेल्या नागरिकांनी आता प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
दिला आहे.





