गजानन महाराज मंदिर परिसरात मंगळसूत्र लांबवणारी महिलांची टोळी जेरबंद; जवाहरनगर पोलिसांची धडक कारवाई
६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; ३ महिला आरोपींना अटक
विशेष प्रतिनिधी दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
श्री गजानन महाराज मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या महिला भाविकांच्या गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने आणि मंगळसूत्र लंपास करणाऱ्या महिलांच्या टोळीचा जवाहरनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन महिला आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे ६५ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गजानन महाराज मंदिर परिसरात भाविकांची नेहमीच मोठी गर्दी असते. याच गर्दीचा गैरफायदा घेत ही टोळी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याचे मणी कुशलतेने लांबवत होती. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर जवाहरनगर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे हलवली. परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची पाहणी केल्यानंतर संशयित महिलांची हालचाल पोलिसांच्या नजरेस पडली.
सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जवाहरनगर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून या तीन महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. आरोपींकडून सोन्याचे मणी, वाटे आणि इतर सोन्याचे दागिने असा एकूण ६५ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.
मंदिर परिसरात होणाऱ्या अशा चोऱ्यांमुळे महिला भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते, परंतु जवाहरनगर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत असून या टोळीने आणखी कुठे अशा प्रकारे चोऱ्या केल्या आहेत का, याचा शोध घेतला जात आहे






