कन्नड तालुक्यातील वाघुळखेडा येथे वीज पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तीन जण गंभीर
शेतातून घरी परतताना कोसळली काळाची कुऱ्हाड
*गावावर शोककळा; आमदार संजना जाधव यांनी घेतली कुटुंबियांची भेट
वाघुळखेडा (प्रतिनिधी/दैनिक शब्दमत):
कन्नड तालुक्यातील वाघुळखेडा परिसरात विजेच्या कडकडाटासह झालेल्या वादळी अवकाळी पावसादरम्यान अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. अंगावर वीज पडल्याने एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण वाघुळखेडा गावावर आणि परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, वाघुळखेडा येथील सय्यद कुटुंबातील सदस्य शेतातील कामे आटोपून घराकडे परतत होते. त्याच वेळी अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आणि विजेचा प्रचंड कडकडाट झाला. शेतातून जात असताना या सर्वांवर थेट वीज कोसळली.
तीन जण जागीच ठार
या भीषण दुर्घटनेत हमीदा सय्यद हमीद (वय ४०), तस्लिमा मुकार सय्यद (वय ३९) आणि अलमिरा खालील सय्यद (वय १७) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू
या दुर्घटनेत हाफिज खालील सय्यद (वय २५), अनिमा निसार सय्यद (वय ३८) आणि फर्जना हमीद सय्यद (वय ३५) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर तात्काळ स्थानिकांनी धाव घेऊन जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आमदार संजना जाधव यांच्याकडून सांत्वन
एकाच कुटुंबातील तिघांचा ऐनवेळी मृत्यू झाल्याची माहिती मिळताच शिवसेना (शिंदे गट) आमदार संजना जाधव यांनी तात्काळ वाघुळखेडा येथे धाव घेतली. त्यांनी पीडित सय्यद कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले तसेच प्रशासनाकडून शक्य ती सर्व मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महसूल व पोलीस प्रशासनाकडून पुढील पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्या
त आली आहे.






