डेनिस घोटाळ्यानंतर ठेकेदार फरार; हिनानगर, पटेलनगरवासीयांचे हाल!
लोकप्रतिनिधींचे मौन, महापालिका अधिकाऱ्यांच्या मेहेरबानीवर बनावट बिलांचा उठाव; नागरिकांचा गुंठेवारी शुल्क भरण्यास नकार
छत्रपती संभाजीनगर (विशेष प्रतिनिधी): दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
एम आय एम विकास कामांमध्ये फेल
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मधील हिनानगर, पटेलनगर आणि सावित्रीबाई फुले नगर भागात ड्रेनेज लाईनच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा समोर आला आहे. अनेक गल्ल्यांमध्ये प्रत्यक्ष ‘हाऊस चेंबर’ न बसवताच कंत्राटदाराने महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून बिलांची उचल केली आणि काम सोडून कंत्राटदार फरार झाला आहे. याप्रकरणी वारंवार तक्रारी करूनही आयुक्त व प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
‘तोंडात गुळ धरून’ बसलेले लोकप्रतिनिधी
नागरिकांनी मोठ्या अपेक्षेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येवर पूर्णपणे मौन बाळगून आहेत. ड्रेनेज लाईनचे साधे कामही पूर्ण होत नसल्याने परिसराला समस्यांच्या विळख्याने घेरले आहे. लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे वैतागलेल्या नागरिकांनी आता थेट वरिष्ठ पातळीवर तक्रारींचा धडाका लावला आहे.
रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य; आरोग्य धोक्यात
पावसाळ्यात व तुंबलेल्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे हिनानगर, पटेलनगर आणि सावित्री नगर भागातील रस्त्यांवर प्रचंड चिखल झाला असून दैनंदिन ये-जा करणे मुश्कील झाले आहे. चेंबर नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर पसरत असून साथीच्या रोगांची भीती निर्माण झाली आहे.
‘आधी विकास करा, मगच गुंठेवारी भरू!’
एकीकडे मूलभूत सुविधा देण्यास महापालिका अपयशी ठरली असताना, दुसरीकडे नागरिकांकडून ‘गुंठेवारी’चे पैसे वसूल करण्यासाठी तगादा लावला जात आहे. यावर आक्रमक होत नागरिकांनी गुंठेवारीकडे पाठ फिरवली आहे. “आधी आमच्या भागातील विकासकामे आणि ड्रेनेज घोटाळ्याची चौकशी करा, मगच गुंठेवारीचा कर भरू,” असा इशारा संतप्त रहिवाशांनी दिला आहे.
तक्रार करूनही टाळाटाळ करणाऱ्या बेजबाबदार अधिकारी आणि पसार झालेल्या कंत्राटदारावर महापालिका आयुक्त कधी आणि काय कारवाई करणार, असा सवाल आता प्रभाग ९ मधील जनता वि
चारत आहे.






