फुलंब्री मतदारसंघातील भाजप
कार्यकर्त्यांना पदोपदी भासते नानांची उणीव !; ‘राजकीय वारस’ ठरलेल्या अनुराधाताई चव्हाण राष्ट्रवादीतून भाजपात आल्या, पण नानांच्या प्रभावाने आमदार होऊनही निष्ठावंतांशी अजून जुळेना नाळ !!
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : कधीकाळी थेट हरिभाऊ बागडे यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी मैदानात उतरलेल्या अनुराधा चव्हाण या नंतरच्या काळात हरिभाऊ बागडे यांच्याच राजकीय वारस कशा ठरल्या, याचे कोडे अजूनही कार्यकर्त्यांना उलगडलेले नाही. ब्युटी पार्लरच्या संचालिका, जिल्हा परिषद सदस्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या अन् विधानसभेच्या उमेदवार, नंतर भाजप कार्यकर्त्या ते आमदार असा प्रवास अनुराधा चव्हाण यांचा राहिला आहे. फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण यांचा विजय केवळ आणि केवळ राजस्थानचे विद्यमान राज्यपाल हरिभाऊ बागडे उर्फ नाना यांच्या प्रभावामुळेच झालेला आहे, हे निर्विवाद सत्य आहे. बागडे यांचा जनसंपर्क, छोट्या छोट्या कार्यकर्त्यांपर्यंत थेट संवाद आणि ओळख, स्वपक्षीय असो की विरोधी पक्षातील कार्यकर्ता त्याचे खरोखरच जनहिताचे काम असेल, तर नानांनी कधीही नकार दिलेला नाही. नानांच्या कृपेने आमदार झालेल्या अनुराधा चव्हाण या त्यांच्या राजकीय वारस म्हणून वावरत असल्या तरी नानांचे गुण मात्र अद्यापही त्यांच्यात उतरले नसल्याची भावना कार्यकर्ते आणि जनसामान्यांमध्ये आहे. परिणामी, सामान्य कार्यकर्त्यांशी अजूनही अनुराधाताई चव्हाण यांची नाळ जुळली नाही, अशी चर्चा होत असते.
अनुराधा चव्हाण या कला शाखेची पदवी घेऊन ब्युटी पार्लर चालवत होत्या. त्यानिमित्ताने झालेल्या ओळखी आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराबाबत जनमानसात आलेली अँटी इन्कम्बसी, नानांचा प्रभाव यामुळे त्या जिल्हा परिषदेत पोहोचल्या. जिल्हा परिषदेच्या छोट्याशा मतदारसंघातही त्यांचा जनसंपर्क आणि त्यांनी केलेली विकासकामे याबद्दल कायमच प्रश्नचिन्ह निर्माण होत गेले. आताही त्यापलीकडे स्थिती नाही, अशी दुर्दैवी भावना भाजपचे निष्ठावंत व्यक्त करत असतात. पती सार्वजनिक बांधकाम विभागातील उच्चपदस्थ अधिकारी असल्याने त्या साई श्रद्धा डेव्हलपर्स या बांधकाम उद्योगाच्या भागीदारही आहेत. हरिभाऊ बागडे यांनी मतदारसंघात उभे केलेले जनसंपर्काचे जाळे तसेच भाजपशी घट्ट राहील, अशी अपेक्षा अनुराधाताईंकडून होती. पण प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही.
कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ अद्यापही जुळलेली नाही. यामागची कारणे काही वेगळी असू शकतात. पण नाना आमदार होते तेव्हा आपलं कोणतंही काम चटकन व्हायचं, नाना आपल्याला ओळख दाखवायचे. आपुलकीने विचारपूस करायचे, पण आता त्यांच्या कथित वारसदारांकडून घोर निराशा होत असल्याची भावना पसरत चालली आहे. याचा फायदा जालन्याचे विद्यमान
सध्या मतदारसंघात चाललंय काय?
सध्या फुलंब्री मतदारसंघात कोणती विकासकामे होत आहेत आणि त्या कामांचा दर्जा काय, यावर बरीच चर्चा घडून येत आहे. हरिभाऊ बागडे आमदार असताना सातत्याने विकासकामांचा प्रवाह मतदारसंघात वाहत होता, तो आता दाखवण्यापुरताच दिसून येत आहे. कार्यकर्त्यांना नानांची आठवण वारंवार येत आहे. पण नाना राजस्थानचे राज्यपाल असल्याने त्यांच्यापर्यंत आपले गाऱ्हाणेही कार्यकर्ते मांडू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे असंतोष व्यक्त करण्यापलिकडे त्यांच्याही हातात काही राहिले नाही. अनुराधा ताई यांनी संपर्क कार्यालयात नानांची मोठी खुर्ची तशीच ठेवून बाजूला स्वतःची छोटी खुर्ची टाकली, पण नानांचे गुण त्यांच्यात कधी उतरणार, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.