पक्ष चालवणारे तिघेच, आम्हाला मान नाही” -तनवाणींची शिरसाटांकडे तक्रार
“पक्ष चालवणारे तिघेच, आम्हाला मान नाही” – तनवाणींची शिरसाटांकडे तक्रार
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : सध्या पक्षाची सर्व सूत्रे आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि जैस्वाल यांचे पुत्र ऋषिकेश जैस्वाल यांच्या हातातच केंद्रित झाली असल्याचा आरोप माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी केला आहे. मध्य मतदारसंघात केवळ प्रचार कार्यालय असल्याचा अर्थ निवडणूकही त्याच मतदारसंघात असल्याचे होत नाही. त्यामुळे पक्षात आम्हाला योग्य मान-सन्मान दिला जात नसेल, तर पदमुक्त करण्यात यावे, अशी स्पष्ट मागणी करत तनवाणी यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप युतीतील चर्चेसाठी कोण प्रतिनिधी जाणार, यावरून हा वाद उफाळल्याची माहिती सूत्रांनी दिली. या चर्चेसाठी तनवाणी यांना डावलण्यात आल्याचा आरोप असून, आमदार प्रदीप जैस्वाल, ऋषिकेश जैस्वाल आणि राजेंद्र जंजाळ हेच बैठकीसाठी उपस्थित होते.
दरम्यान, तनवाणी यांनी शिरसाट यांना सांगितले की, पक्षात इतर पदाधिकाऱ्यांना कोणताही मान दिला जात नाही. लोकसभेचे संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत असतानाही मला बाजूला ठेवण्यात आले. यापूर्वी जिल्हाप्रमुख म्हणून काम केलेल्या माझ्या अनुभवाचा पक्षाला उपयोग करून घेतला जाणार की नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या तक्रारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येतील, असे सांगत शिरसाट मुंबईकडे रवाना झाले असून, त्यांच्याकडूनच या प्रकरणावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या संदर्भात जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत चर्चेसाठी पाच सदस्यांची मुख्य समन्वय समिती नेमली आहे. या समितीकडेच युतीबाबत चर्चा करण्याची जबाबदारी आहे. तनवाणी यांना भाजपच्या बैठकीसाठी उपस्थित राहायचे होते; मात्र त्यांच्याकडे नियोजन समितीची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडावी, तर आम्ही आमच्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडत आहोत, असे जंजाळ यांनी स्पष्ट केले.
………………….
