ई-केवायसीअभावी २६ लाख ‘लाडक्या बहिणी’ अपात्र ठरण्याची शक्यता
पडताळणी अंतिम टप्प्यात; ३० एप्रिल अंतिम मुदत
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
मुंबई | प्रतिनिधी
राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे तब्बल २६ लाखांहून अधिक लाभार्थी अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महिला व बाल विकास विभागाकडून पडताळणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ३० एप्रिल ही शेवटची मुदत देण्यात आली आहे.
राज्यातील एकूण २ कोटी ४७ लाख लाभार्थ्यांपैकी सुमारे २६ लाख ३४ हजार महिलांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. यासाठी यापूर्वी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, आता मुदत संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असल्याने मोठ्या संख्येने लाभार्थी अपात्र ठरण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कागदपत्रांच्या अभावामुळे अडथळा
अनेक लाभार्थ्यांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. उर्वरित अल्प कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
गैरवापरावर सरकारचा बडगा
दरम्यान, या योजनेत गैरवापर झाल्याचेही उघड झाले आहे. सुमारे १२,४१५ महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले असून, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. तसेच काही पुरुषांनीही चुकीची माहिती देऊन लाभ घेतल्याचे समोर आले आहे.
अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असूनही लाभ घेतलेल्या आणि सरकारची फसवणूक करणाऱ्या लाभार्थ्यांकडून सुमारे १६५ कोटी रुपयांची वसुली करण्यात येणार आहे.
एप्रिलअखेर चित्र स्पष्ट
सध्या सुरू असलेली पडताळणी प्रक्रिया ३० एप्रिलपर्यंत, बँक व्यवहाराच्या वेळेपर्यंत सुरू राहणार आहे. दुष्काळी परिस्थिती व उष्णतेची लाट लक्षात घेऊन लाभार्थ्यांना शेवटची संधी देण्यात आली असली, तरी एप्रिलअखेर या योजनेचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
–
(दैनिक शब्दमत)





