मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

पुणे पोलिसांना झाले तरी काय? ५ लाखांची लाच घेतल्यानंतर आणखी दीड लाख स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

On: May 10, 2026 12:03 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे पोलिसांना झाले तरी काय?

 

५ लाखांची लाच घेतल्यानंतर आणखी दीड लाख स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

 

दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क

पुणे प्रतिनिधी शहर

 

पुणे : शहर पोलीस दलात भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेण्यात येत असतानाच पुणे पोलिसांची पुन्हा एकदा मोठी बदनामी करणारी घटना समोर आली आहे. चेक बाऊन्स प्रकरणातील अजामीनपात्र वॉरंटची बजावणी टाळण्यासाठी आधीच ५ लाख रुपयांची लाच घेतल्यानंतर पुन्हा नव्याने दीड लाख रुपये स्वीकारताना कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले.

 

गणेश शहाजी कस्पटे (वय ४०, रा. शंकर सुमन हाईट्स, भेकराईनगर, फुरसुंगी) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.

 

विशेष म्हणजे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी भ्रष्टाचार व हप्तेवसुलीविरोधात कठोर भूमिका घेतल्यानंतर अवघ्या आठवडाभरात लाच घेताना पकडला गेलेला हा तिसरा पोलीस कर्मचारी आहे. यापूर्वी खंडणीखोर पोलीस उपनिरीक्षकासह तिघांना बडतर्फ करण्यात आले होते, तर सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार आणि पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे यांना निलंबित करण्यात आले होते.

 

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्या कंपनीत काम करतात त्या कंपनीच्या मालकाविरुद्ध हैदराबाद न्यायालयात चेक बाऊन्सचा खटला सुरू होता. त्या प्रकरणात मालकाविरुद्ध नॉन-बेलेबल वॉरंट जारी करण्यात आले होते. हे वॉरंट बजावू नये आणि अटक टाळण्यासाठी गणेश कस्पटे याने ३ मार्च २०२६ रोजी संबंधितांकडून ५ लाख रुपयांची लाच स्वीकारली होती.

 

त्यानंतर पुन्हा १ मे रोजी वॉरंट परत आल्याचे सांगत अटक न करण्यासाठी आणि मदत करण्याच्या मोबदल्यात अडीच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. तडजोडीनंतर दीड लाख रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने ५ मे रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. पडताळणीत आरोपीने पूर्वी ५ लाख रुपये स्वीकारल्याची कबुली देत पुन्हा लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

 

यानंतर एसीबीने बोट क्लब रोड परिसरातील सुलक्स कल्पतरू गार्डन सोसायटीसमोर सापळा रचला. बुधवारी दुपारी सुमारे दोन वाजता तक्रारदाराकडून दीड लाख रुपये स्वीकारताना गणेश कस्पटे याला रंगेहाथ पकडण्यात आले.

 

दरम्यान, कारवाईदरम्यान आरोपीने तक्रारदाराच्या छातीला चावा घेतला तसेच सापळा पथकाला धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण करत पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील व अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर आणि त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त भारती मोरे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment