किमान वेतनानंतर आता कचरा संकलन कामगारांना मिळणार वैद्यकीय सुविधा
मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात कामगारांचा
जल्लोष; पत्रकार, अधिकारी व कंपनी प्रतिनिधींचा सत्कार
दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर:
मनपाची स्वच्छता कंपनी ‘अर्बन वेस्ट हँडलिंग एलएलपी’मधील कचरा संकलन करणाऱ्या कामगारांना अखेर न्याय मिळाला आहे. सततच्या प्रयत्नांनंतर कामगारांना किमान वेतनाप्रमाणे पगारवाढ लागू करण्यात आली असून, यासाठी पाठपुरावा करणारे पत्रकार, मनपा अधिकारी आणि कंपनी प्रतिनिधींचा जाहीर सत्कार सोहळा काल (१९ जून) मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे अत्यंत उत्साहात पार पडला. पगारवाढीनंतर उद्भवलेली वैद्यकीय सुविधेची (ESIC) तांत्रिक अडचणही संघटनेच्या पाठपुराव्यामुळे दूर झाल्याने हजारो कामगारांनी यावेळी एकच जल्लोष केला.
तांत्रिक पेच सुटला; जागेवरच वैद्यकीय सुविधा देण्याची घोषणा
शासकीय नियमांनुसार, २१ हजार रुपयांपेक्षा जास्त वेतन असणाऱ्या कामगारांना ईएसआयसी (ESIC) सुविधा लागू होत नाही. त्यामुळे किमान वेतनानुसार पगारवाढ झाली असली, तरी कामगारांची वैद्यकीय सुरक्षा धोक्यात आली होती. कामगार किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आजारपणाचा संपूर्ण खर्च स्वतः करावा लागणार होता. ही अतिशय गंभीर बाब संघटनेचे अध्यक्ष राजुभाऊ मिसाळ यांनी तातडीने मनपा अधिकारी आणि कंपनी मालकांच्या निदर्शनास आणून दिली.
यावर सकारात्मक पाऊल उचलत, ‘कंपनीच्या वतीने कामगारांना स्वतंत्र वैद्यकीय सुविधा (Medical Facility) उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्यावर काम सुरू आहे’, अशी महत्त्वपूर्ण घोषणा व्यासपीठावरून करण्यात आली. या निर्णयामुळे उपस्थित हजारो कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.
अधिकारी व पत्रकारांचा सन्मान
कामगारांना हक्काचे वेतन मिळवून देण्यासाठी पत्रकार आणि प्रशासनाने मोठी भूमिका बजावली. याबद्दल कृतज्ञता म्हणून मनपाचे अतिरिक्त आयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख श्री. नंदकिशोर भोंबे साहेब, अर्बन कंपनीचे मुख्य प्रतिनिधी अनवर सत्तार साहेब आणि शहरातील आघाडीच्या पत्रकारांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला मनपा उप-आयुक्त श्री. नंदकिशोर भोंबे साहेब यांनी धावती भेट देऊन उपस्थित कामगारांना संबोधित केले. आगामी काळात कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
हजारो कामगारांची उपस्थिती
या सत्कार सोहळ्याला कामगार संघटनेचे अध्यक्ष सलीम शहा, अर्बन कंपनीचे प्रतिनिधी अनवर सत्तार यांच्यासह प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी— ए.एन.आय. (ANI) चे रिपोर्टर अब्दुल हादी, एम.सी.एन. (MCN) न्यूजचे काझी मोइनोद्दीन, औरंगाबाद टाईम्सचे सलीम भाई, दैनिक एकमतचे राजू मस्के,
दैनिक शब्दमतचे अजमत पठाण
आणि आवाज इंडियाचे बाळासाहेब ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वच्छता दूत म्हणून अहोरात्र शहराची सेवा करणाऱ्या हजारो कचरा संकलन कामगारांच्या उपस्थितीने हा सोहळा अभूतपूर्व ठरला. कामातील अडचणींवर मात करत हक्क आणि आरोग्य सुरक्षा मिळाल्याची भावना कामगारांनी यावेळी व्यक्त केली.







