वडिलांच्या निधनाचे दुःख पचवत NEET मध्ये घवघवीत यश; टेंभुर्णीच्या राजवर्धन कळंबे व अश्विनी भागवत यांचा प्रेरणादायी प्रवास
- दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
जाफराबाद प्रतिनिधी
दुःखाचा डोंगर कोसळला, आयुष्याची सर्वात मोठी परीक्षा समोर उभी राहिली; पण परिस्थितीसमोर न हारता जिद्द, चिकाटी आणि स्वप्नांवर विश्वास ठेवत टेंभुर्णी येथील दोन विद्यार्थ्यांनी नीट (NEET) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
नीट परीक्षेतील गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुन्हा घेण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी चिंता व मानसिक ताण निर्माण झाला होता. अशा कठीण परिस्थितीतही टेंभुर्णीतील राजवर्धन कळंबे आणि अश्विनी सांडू भागवत यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अनुक्रमे ४५६ आणि ४८० गुण मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली.
राजवर्धन कळंबे यांचे वडील, सामाजिक कार्यकर्ता, शिक्षक, पत्रकार तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले स्व. विनोद कळंबे यांचे २२ मार्च रोजी अपघाती निधन झाले. वडिलांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही राजवर्धन यांनी खचून न जाता वडिलांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्धाराने अभ्यास सुरू ठेवला आणि नीट परीक्षेत ४५६ गुण मिळवून उल्लेखनीय यश मिळविले.
दुसरीकडे, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील अश्विनी सांडू भागवत हिची कहाणी तर अधिक हृदयस्पर्शी आहे. ज्या दिवशी तिची नीट परीक्षा होती, त्याच दिवशी सकाळी तिच्या वडिलांचे निधन झाले. तिची परीक्षा बिघडू नये म्हणून कुटुंबीयांनी ही दुःखद बातमी तिला परीक्षेनंतरच सांगितली. दुपारी परीक्षा देऊन रात्री वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ तिच्यावर आली. या असह्य मानसिक वेदनेतूनही अश्विनीने ४८० गुण मिळवत आपल्या जिद्दीचा ठसा उमटविला.
दोन्ही विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत दाखविलेली मानसिक ताकद, कष्ट आणि चिकाटी ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन होत असून, या दोघांच्या यशाने टेंभुर्णी परिसराचा अभिमान उंचावला आहे.







