बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश करून वास्तवास असलेल्या दोन बांगलदेशी नागरिकांचा पर्दाफाश ..
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीसांची कारवाई …
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
मा. प्रकाश जाधव, पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांची पडताळणी व त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मोहीम सुरू असताना, दिनांक 11/08/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना पोलीस ठाणे चिकलठाणा हद्यीतील मांडकी शिवार परिसरात काही परदेशी व्यक्ती संशयास्पदरीत्या वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
सदर माहितीची खातरजमा करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे चिकलठाणा यांच्या पथकाने संयुक्तरीत्या मांडकी शिवारातील इमानदार ढाबा या हॉटेलवर कुक आणि वेटर म्हणुन कामास असलेल्या दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची ओळख व नागरिकत्वाबाबत सखोल चौकशी करण्यात आली.
यामध्ये १) मोहम्मद बिलाल मोहम्मद मुकलिसउद्दल रेहमान, वय 27 वर्षे, मूळ रा. काजीपेठ, पोलियानापूर, ठाणे महेशपूर, जि. झिनायदा, बांगलादेश, सध्या मांडकी शिवार,पळशी, छत्रपती संभाजीनगर आणि २) मोहम्मद रासेल मोहम्मद इरशाद अली, वय 19 वर्षे, मूळ रा. पोलियानापूर, मजीरपाडा, ठाणे महेशपूर, जि. झिनायदा, बांगलादेश, सध्या मांडकी शिवार,पळशी, छत्रपती संभाजीनगर यांचा समावेश आहे.
पोलीसांनी विचारपुस केली असता सुरुवातीस त्यांनी स्वतःची ओळख भारतीय नागरिक म्हणून सांगितली. मात्र, त्यांच्या बोलण्यातुन संशय निर्माण झाल्याने त्यांना विश्वासत घेवुन अधिक सखोल चौकशी केली असता त्यांनी आपण बांगलादेशातील रहिवासी असल्याचे सांगितले. त्यांच्या मोबाईल फोन व उपलब्ध कागदपत्रांची तपासणी केली असता त्यांचेजवळ बांगलादेश सरकारच्या National Identity Card,सह बांगलादेशातील जन्मप्रमाणपत्र व बांगलादेशातील नातेवाईकांशी संपर्क केल्याचे आढळून आले आहे. या कागदपत्राचे आधारे ते बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले आहे.
यामध्ये मोहम्मद बिलाल याने सन 2017-18 च्या सुमारास बांगलादेशातून दलालाच्या माध्यमातून भारत-बांगलादेश सीमा अनधिकृतरीत्या ओलांडून भारतात प्रवेश केल्याची माहिती दिली. त्यानंतर कोलकाता, मुंबई व छत्रपती संभाजीनगर येथे विविध ठिकाणी काम केल्याचे तसेच कोविड-19 कालावधीत बांगलादेशातील मूळ गावी परतल्यानंतर पुन्हा भारतात आल्याचे त्याने सांगितले. मोहम्मद रासेल यानेही सुमारे पाच वर्षांपूर्वी बांगलादेशातून भारतात अनधिकृतरीत्या प्रवेश केल्याचे व त्यानंतर कोलकाता, मनमाड व छत्रपती संभाजीनगर परिसरात विविध ठिकाणी काम केल्याची माहिती दिली आहे.
दोन्ही व्यक्ती बांगलादेशातील झिनायदा जिल्ह्यातील रहिवासी असून, सध्या मांडकी शिवारातील इमानदार ढाबा येथे कामाच्या निमित्ताने वास्तव्यास असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. भारतात प्रवेश करताना त्यांच्याकडे आवश्यक वैध पासपोर्ट, व्हिसा अथवा अन्य वैध प्रवासी कागदपत्रे नसल्याचे चौकशीत आढळून आले आहे. तसेच भारतात वास्तव्यास असताना त्यांनी आपले बांगलादेशी नागरिकत्व लपवून भारतीय नागरिक असल्याचे भासविले आहे याबाबतही तपास सुरू आहे.
सदर दोन्ही व्यक्तींच्या भारतातील वास्तव्याचा कालावधी, त्यांनी वास्तव्यासाठी वापरलेली ठिकाणे, रोजगार, स्थानिक संपर्क याबाबत पुढील तपास करण्यात येत आहे. त्यांच्या बांगलादेशी नागरिकत्वाची अधिकृत पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू असून, उपलब्ध कागदपत्रे व तपासातील निष्कर्षांच्या आधारे Immigration and Foreigners Act, 2025 मधील लागू तरतुदींनुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. सक्षम प्राधिकरणाकडे आवश्यक प्रस्ताव सादर करून दोन्ही व्यक्तींना भारतातून बांगलादेशात हद्दपार/Deport करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
या कारवाईतून छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश करून वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्धची सतर्कता अधोरेखित केली आहे. तसेच जिल्ह्यातील नागरिकांना तसेच हॉटेल व ढाबा चालक, घरमालक यांना आवाहन केले आहे कि,त्यांनी बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना रोजगार अथवा निवास देताना त्यांची ओळख व आवश्यक कागदपत्रांची योग्य पडताळणी करावी. संशयास्पद नागरिकत्व अथवा बेकायदेशीर वास्तव्याबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस यंत्रणेला कळवावे.
नमुद कारवाई ही मा. प्रकाश जाधव, पोलीस अधीक्षक, मा. प्रशांत स्वामी, अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा चे पो.नि. विजयसिंग राजपूत, पो.उप.नि. लहु घोडे, पोलीस अंमलदार विठ्ठल डोके, सुनील गोरे, संतोष डोंगरे, सनी खरात, संदीप कोळगे, निलेश कुडे तसेच पोलीस ठाणे चिकलठाणा पो.नि राजेंद्र बनसोडे,पो.उप.नि श्रीनिवास धुळे, पोलीस अंमलदार दिपक देशमुख, किशोर काळवणे, गणेश कोरडे, सुनिल सुरासे, सतिष देवकर यांनी केली आहे.





