डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांची मागणी; लेखी तक्रारीनंतरही मनपा कर्मचाऱ्यांची दांडी
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाढता डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगर परिसरात दुर्गंधी पसरली असून, साचलेले पाणी व अस्वच्छतेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले आहे.
यासंदर्भात दैनिक शब्दमतचे मुख्य संपादक आजमत पठाण यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडे लेखी निवेदन देऊन परिसरात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी, धूर फवारणी तसेच साचलेल्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याची मागणी केली.
मात्र, लेखी तक्रार करूनही अद्याप महानगरपालिकेचे संबंधित कर्मचारी पाहणी करण्यासाठी किंवा आवश्यक उपाययोजना करण्यासाठी परिसरात आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने दखल घेऊन फवारणी, धूर फवारणी आणि स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
लेखी तक्रारीनंतरही कारवाई का झाली नाही? असा सवाल उपस्थित करत संबंधित विभागाने तातडीने कर्मचारी पाठवून प्रत्यक्ष पाहणी करावी आणि हिना नगर, पटेल नगर व सावित्री नगर परिसरातील दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दैनिक शब्दमतचे मुख्य संपादक आजमत पठाण यांनी केली आहे.
दैनिक शब्दमत | महाराष्ट्राचा बुलंद आवाज





